पुढील वर्षी टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे आणि बाहेरून येणाऱ्या चाहत्यांचे लसीकरण जपानमधील जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे, असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांनी सोमवारी पंतप्रधान योशिहिदे सुगा यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर सांगितले.

आठ महिन्यांपूर्वी ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यानंतर बाख यांचा हा पहिलाच जपान दौरा असून, त्यांची प्रथमच येथील पंतप्रधानांशी भेट झाली आहे. जपानमधील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक प्रयत्नशील आहे. त्यामुळेच ऑलिम्पिकमधील सहभागी खेळाडू आणि अन्य परदेशी चाहते हे लस घेऊनच देशात प्रवेश करू शकतील, असे बाख यांनी स्पष्ट केले. बाख यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात ते अनेक बैठकांना हजेरी लावणार असून, येथील नागरिकांना ऑलिम्पिकच्या आयोजनाबाबत विश्वास दाखवणे, हे त्यांचे महत्त्वाचे लक्ष्य आहे. २३ जुलै, २०२१पासून ऑलिम्पिकला प्रारंभ होणार आहे.

गेल्या आठवडय़ात लसीच्या निर्मितीसंदर्भात शास्त्रज्ञांनी उत्तम यश मिळवले आहे. लस उपलब्ध झाल्यास ऑलिम्पिक समिती आणि संयोजन समिती यांना ऑलिम्पिकचे आयोजन योग्य रीतीने करता येईल, असे बाख म्हणाले.

‘‘पुढील वर्षी ऑलिम्पिकचे आयोजन करून मानवतेकडून विषाणूचा हा पराभव आहे, हे दाखवून द्यायचे आहे,’’ असे सुगा यांनी सांगितले.

ऑलिम्पिक न झाल्यास मोठे नुकसान

ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकसाठी १५४०० खेळाडू सहभागी होणार असून, याशिवाय सुमारे १० हजारांहून अधिक प्रशिक्षक, पदाधिकारी, पंच, विशेष अतिथी, पुरस्कर्ते, प्रसारमाध्यम प्रतिनिधी आणि प्रक्षेपण कर्मचारी जपानमध्ये येतील. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला ७३ टक्के  उत्पन्न ऑलिम्पिकच्या प्रक्षेपणातून मिळेल. एनबीसी ही अमेरिके ची प्रक्षेपण कं पनी ऑलिम्पिकसाठी एक अब्ज डॉलर्स रुपये मोजणार आहे. त्यामुळे ऑलिम्पिक न झाल्यास मोठे नुकसान होऊ शके ल. ऑलिम्पिक न झाल्यास जपानचेही मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान होईल. आतापर्यंत ऑलिम्पिकच्या तयारीसाठी २५ अब्ज डॉलर्स खर्च झाला असून, यापैकी ५.६ अब्ज डॉलर रक्कम ही जनतेकडून मिळालेली आहे.