ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला सलग दुसऱ्या वन-डे सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. ३ वन-डे सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांची कामगिरी ही निराशाजनक राहिली. सहावा गोलंदाज कोण हा प्रश्न अनुत्तरित असताना दुसऱ्या सामन्यात विराटने मयांक अग्रवालचा सहावा गोलंदाज म्हणून वापर केला. यानंतर हार्दिक पांड्यानेही सामन्यात गोलंदाजी केली. परंतू सहावा गोलंदाज म्हणून मयांकचा वापर करण्याच्या विराटच्या निर्णयावर माजी भारतीय गोलंदाज डोड्डा गणेश यांनी टीका केली आहे.

अवश्य वाचा – BLOG : काहीतरी गंडलंय हे नक्की फक्त विराटने ते मान्य करायला हवं !

गणेश यांनी विराटचा हा निर्णय म्हणजे निव्वळ वेडेपणा असल्याचं म्हटलंय. मयांकला मी १९ वर्षाखालील संघाकडून खेळत असताना पाहतो आहे. कर्नाटकमधल्या टीम मॅनेजमेंटने कधीही मयांकचा गोलंदाज म्हणून विचारही केला नाही. मी त्याला फार क्वचितवेळा नेट्समध्ये गोलंदाजी करताना पाहिलं आहे, आणि तोच आज भारताचा सहावा गोलंदाज आहे, अशा आशयाचं ट्विट गणेश यांनी केलं आहे.

दरम्यान, पहिल्या वन-डे सामन्याच्या तुलनेत भारतीय गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतू बुमराह आणि शमीची षटकं सावधपणे खेळून काढत फिंच आणि वॉर्नर जोडीने खेळपट्टीवर आपला जम बसवला. यानंतर दोन्ही फलंदाजांनी पहिल्या सामन्याप्रमाणेच फटकेबाजी सुरुवात केली. पॉवरप्लेच्या षटकांमध्ये भारतीय गोलंदाज ऑस्ट्रेलियाची सलामीची जोडी फोडण्यात अपयशी ठरले. दोन्ही फलंदाजांनी आपली अर्धशतकं पूर्ण केली. अखेरीस मोहम्मद शमीने कर्णधार फिंचला माघारी धाडत भारताला पहिलं यश मिळवून दिलं, त्याने ६० धावा केल्या. यानंतर ठराविक अंतराने डेव्हिड वॉर्नरही जाडेजाच्या गोलंदाजीवर चोरटी दुहेरी धाव घेत असताना श्रेयस अय्यरच्या अचूक फेकीमुळे धावबाद झाला. वॉर्नरने ७७ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ८३ धावा केल्या.

अवश्य वाचा – विराटची कॅप्टन्सी न समजण्यासारखी…सलग दुसऱ्या पराभवानंतर गंभीरची कोहलीवर टीका

यानंतर मैदानावर आलेल्या स्टिव्ह स्मिथने सामन्याची सूत्र आपल्या हाती घेत फटकेबाजीला सुरुवात केली. दोन विकेट घेतल्यानंतर आत्मविश्वास वाढलेल्या भारतीय संघाला स्मिथने पुन्हा एकदा बॅकफूटला ढकललं. मार्नस लाबुशेनसोबत स्मिथने तिसऱ्या विकेटसाठी १३६ धावांची भागीदारी केली. भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल करत स्मिथने चौफेर फटकेबाजी केली. ६४ चेंडूत १४ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने स्मिथने १०४ धावा केल्या. हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर स्मिथ शमीकडे झेल देऊन माघारी परतला. यानंतर लाबुशेनने मॅक्सवेलच्या साथीने फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाला त्रिशतकी धावसंख्या गाठून दिली. यादरम्यान लाबुशेनने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. ४९ व्या षटकात बुमराहच्या गोलंदाजीवर ७० धावा काढून तो माघारी परतला. नवदीप सैनीच्या अखेरच्या षटकात मॅक्सवेलनेही आपलं अर्धशतक पूर्ण केलं, त्याने नाबाद ६३ धावा केल्या.

अवश्य वाचा – Ind vs Aus : भारताच्या पराभवासाठी विराटने गोलंदाजांना ठरवलं जबाबदार, म्हणाला…