भारतभूमीत एकच सामना खेळता आलेला पाकिस्तानचा फिरकीपटू सईद अजमल याला आता भारत दौऱ्याची उत्सुकता लागून राहिली आहे. ‘‘उशिराच माझ्या कारकीर्दीला सुरुवात झाली. २०११च्या विश्वचषक स्पर्धेतील मोहालीत झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मला भारताविरुद्ध खेळता आले. भारतात जाऊन भारतीय फलंदाजांसमोर गोलंदाजी करणे, हे एक आव्हानच आहे. त्यामुळे मला भारत दौऱ्याची उत्सुकता आहे,’’ असे अजमल याने सांगितले.
वयाच्या ३१व्या वर्षी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या अजमलची २००७च्या भारत दौऱ्यासाठी पाकिस्तानच्या संभाव्य संघात निवड झाली होती. पण अंतिम संघात स्थान मिळवण्यात त्याला अपयश आले. ‘‘भारतात एक मोठी मालिका खेळून आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची प्रत्येक क्रिकेटपटूची इच्छा असते. त्यामुळे मला संधी न मिळाल्याचे दु:ख झाले होते. आता माझी ती इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे भारतात खेळण्यासाठी मी आतुर आहे,’’ असेही त्याने सांगितले.
अजमलने आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत गोलंदाजांमध्ये अव्वल स्थान पटकावले असून कसोटी आणि ट्वेन्टी-२० क्रमवारीत तो पहिल्या तीन जणांमध्ये आहे. तो म्हणाला, ‘‘भारताविरुद्धची मालिका नियोजित वेळापत्रकानुसारच होईल, अशी आशा आहे. या मालिकेसाठी मी कसून तयारी करत आहे. भारताच्या अव्वल फलंदाजांना गोलंदाजी करण्याचे आव्हान मला पेलावे लागणार आहे. विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आणि आशिया चषक स्पर्धेत भारतीय फलंदाजांना गोलंदाजी करण्याचा अनुभव चांगला होता.
त्याचा फायदा मला या वेळी नक्कीच होईल. भारतात पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे जल्लोषात स्वागत होईल, अशी आशा आहे.’’