मैदानावरील पंचांना संपूर्ण सामन्यादरम्यान प्रत्येक घडामोडीवर बारीक लक्ष ठेवायचे असते, परंतु तिसऱ्या पंचांना मात्र त्या तुलनेत कामाचा इतका ताण नसतो. त्यामुळे तिसऱ्या पंचांनीच गोलंदाजाने टाकलेला चेंडू ‘नो-बॉल’ आहे की नाही, हे तपासून त्वरित मैदानावरील पंचांना कळवावे, अशी अपेक्षा ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज अ‍ॅडम गिलख्रिस्टने व्यक्त केली.

मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘वेस्टर्न ऑस्ट्रेलिया’ कार्यक्रमासाठी गिलख्रिस्टसह विख्यात समालोचक हर्ष भोगलेसुद्धा उपस्थित होते. या वेळी गिलख्रिस्टने इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) नव्या हंगामात लागू करण्यात येणाऱ्या नियमांविषयी त्याचे मत मांडले.

‘‘नो-बॉलचा गेल्या ‘आयपीएल’मध्ये अनेक संघांना फटका पडला. त्यामुळे पंचगिरीच्या दर्जावरही अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले. माझ्या मते, मैदानावरील पंचांना त्वरित गोलंदाजाच्या पायाकडे आणि फलंदाजाकडे लक्ष देणे आव्हानात्मक आहे. त्याशिवाय त्यांना चेंडू ज्या दिशेला जाईल, त्या दिशेकडे सातत्याने नजर ठेवावी लागते. मात्र यासाठी विशेष पंच ठेवण्याची काहीच गरज नाही,’’ असे गिलख्रिस्ट म्हणाला.

‘‘तिसऱ्या पंचांना मैदानावरील पंचांच्या तुलनेत नक्कीच फारसा कामाचा ताण नसतो. त्याशिवाय एखाद्या चेंडूचा रिप्ले तयार होण्यासाठी अधिकाधिक पाच सेकंदांचा अवधी लागतो. त्यामुळे गोलंदाजाने प्रत्येक चेंडू टाकल्यावर तिसरा पंच लगेचच रिप्ले पाहून मैदानावरील पंचांना तो चेंडू नो-बॉल आहे की नाही हे कळवू शकतात; परंतु तरीही जर यासाठी चौथा पंच आवश्यक वाटत असेल, तर त्याविषयी मी काहीच बोलणार नाही,’’ असेही ४७ वर्षीय गिलख्रिस्टने सांगितले.

विश्वचषकाच्या प्रबळ दावेदारांमध्ये भारताचा समावेश!

ट्वेन्टी-२० क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असला तरी भारतीय संघ पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या प्रबळ दावेदारांपैकी एक नक्कीच आहे, असे मत गिलख्रिस्टने व्यक्त केले.

‘‘२०२०चा विश्वचषक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला असल्याने सर्व संघ जोमाने तयारीला लागले आहेत. निश्चितच यजमान ऑस्ट्रेलियाला विश्वचषक उंचावण्याची सर्वाधिक संधी आहे; परंतु त्याबरोबरच भारत, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे संघसुद्धा उपांत्य फेरीत नक्कीच मजल मारतील,’’ असे गिलख्रिस्ट म्हणाला. महिलांच्या विश्वचषकासाठी मात्र गिलख्रिस्टने ऑस्ट्रेलिया व वेस्ट इंडिज यांना पसंती दर्शवली आहे.

हरमनप्रीतमुळे सीमारेषेची लांबी वाढवण्यात आली -हर्ष भोगले

भारतीय महिला संघाची प्रमुख फलंदाज हरमनप्रीत कौरकडे मैदानाबाहेरही चेंडू भिरकावण्याची क्षमता असल्याने गेल्या काही वर्षांत महिलांच्या सामन्यातील सीमारेषेची लांबीही वाढवण्यात आली आहे, अशा शब्दांत समालोचक हर्ष भोगले यांनी हरमनप्रीत कौरवर स्तुतिसुमने उधळली.

‘‘महिलांच्या विश्वचषकात कोणता संघ बाजी मारेल, याविषयी मी ठामपणे सांगू शकत नाही; परंतु भारतीय संघातील हरमनप्रीत कौरमुळे ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये आणि भारतातील सामन्यांतही सीमारेषेची लांबी वाढवण्यात आली आहे, हे खरे. तिची फलंदाजी पाहताना एक वेगळीच मजा येते. कोणत्याही गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूला ती स्टेडियमबाहेर भिरकावू शकते,’’ असे भोगले म्हणाले.