परस्पर हितसंबंधाचे आरोप होऊ लागल्यानंतर भारताचा माजी फलंदाज व्ही. व्ही. एस. लक्ष्मण याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासकीय समितीवर आगपाखड केली आहे. क्रिकेट सल्लागार समिती सांभाळणाऱ्या प्रशासकीय समितीने आपल्या भूमिकेबद्दल कोणतेही स्पष्टीकरण केलेले नाही, अशा शब्दांत लक्ष्मणने पत्राद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मैदानाबाहेर आपल्या शांत स्वभावाने ओळखल्या जाणाऱ्या लक्ष्मणने लवाद अधिकाऱ्यांना कडक शब्दांत पत्र लिहिले आहे. लक्ष्मण म्हणाला की, ‘‘याआधी खूप काही आश्वासने दिल्यानंतर क्रिकेट सल्लागार समिती ही फक्त राष्ट्रीय संघांसाठी प्रशिक्षकांची नियुक्ती करण्याचे काम करते. ७ डिसेंबर २०१८ रोजी आपल्या भूमिका आणि जबाबदाऱ्यांबाबत प्रशासकीय समितीने मार्गदर्शन करावे, असे पत्र मी लिहिले होते. आजतागायत त्यांच्याकडून कोणतेही प्रत्युत्तर आलेले नाही. २०१५ रोजी प्रसिद्ध झालेल्या पत्रकात क्रिकेट सल्लागार समितीचा कालावधी निश्चित करण्यात आला नव्हता. मात्र तरीही सध्या ही समिती अस्तित्वात आहे की नाही, याबाबत कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही.’’

सध्या दुहेरी भूमिका बजावणाऱ्या लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकर यांच्या भूमिकांबाबत मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे आजीवन सदस्य संजीव गुप्ता यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर दोघांनीही पत्राद्वारे आपल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत. ‘‘इच्छा नसतानाही मी क्रिकेट सल्लागार समितीचा सदस्य होण्यास होकार दर्शवला होता. क्रिकेट सल्लागार समिती ही कायमस्वरूपी नाही. त्यामुळे माझ्यावर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे आहेत.’’