उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे कारवाई

 

इंग्लंडचा फलंदाज अ‍ॅलेक्स हेल्स उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे विश्वचषकासाठी निवडल्या गेलेल्या संघातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) नियमितपणे घेतलेल्या उत्तेजक चाचणीत दुसऱ्यांदा दोषी आढळल्यामुळे ईसीबीचे संचालक अ‍ॅशले गाईल्स आणि निवड समितीने हा निर्णय घेतला आहे. इंग्लंडमध्ये ३० मेपासून सुरू होणाऱ्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेसाठी अ‍ॅलेक्स हेल्सची इंग्लंडच्या १५ जणांच्या प्राथमिक संघात निवड करण्यात आली होती.

या कारवाईमुळे हेल्सला आर्यलडविरुद्धचा एकमेव एकदिवसीय सामना, पाकिस्तानविरुद्धचा एकमेव ट्वेन्टी-२० सामना आणि पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका तसेच विश्वचषक स्पर्धेतील आपले स्थान गमवावे लागणार आहे. त्याच्या जागी बदली खेळाडूची निवड केली जाणार असून जेम्स विन्स याला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

या निर्णयाविषयी गाईल्स म्हणाले की, ‘‘खूप विचाराअंती कठोरपणे हा निर्णय घेण्यात आला आहे. इंग्लंड संघामध्ये चांगले वातावरण राहावे, यासाठी आम्ही खूप मेहनत घेत आहोत. खेळाडूंनी फक्त आपल्या खेळावरच लक्ष केंद्रित करावे आणि त्यांचे लक्ष अन्य गोष्टींकडे विचलित होऊ नये, याची दक्षता आम्ही घेत आहोत. खेळाडू म्हणून हा अ‍ॅलेक्स हेल्सच्या कारकीर्दीचा अंत नसून त्याच्या मदतीसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.’’

काही महिन्यांपूर्वीच ब्रिस्टॉलमधील रस्त्यावर हाणामारी केल्याप्रकरणी याआधी हेल्सवर सहा सामन्यांची बंदी घालण्यात आली होती. हेल्सने ११ कसोटी, ७० एकदिवसीय आणि ६० ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे.