भारतात क्रिकेटला धर्म मानला जातो आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव असं संबोधलं जातं. पण गेल्या वर्ष – दोन वर्षात भारतीय क्रिकेटला एक नवीन देव सापडू लागला आहे. तो देव म्हणजे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी. चाहत्यांनी याचा वारंवार प्रत्यय आणून दिला आहे.

याचे ताजे उदाहरण म्हणजे सध्या सुरु असलेली आयपीएल स्पर्धा. ईडन गार्डन्स मैदानावर चेन्नई सुपरकिंग्ज आणि कोलकाता नाइट राइडर्स या दोन संघांमध्ये गुरुवारी आयपीएलचा सामना रंगला. या सामन्यात कोलकाता टीमचा विजय झाला. पण, चर्चा रंगली ती धोनीच्या पाया पडण्यासाठी आलेल्या चाहत्याची. धोनीबद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी तो चाहता धोनीजवळ आला. त्याने चटकन धोनीचे पाय धरले. धोनीनेदेखील आपुलकीने त्याच्या पाठीवर हात फिरवला. त्यानंतर सुरक्षारक्षक आले आणि त्या चाहत्याला लांब घेऊन गेले.

अशा पद्धतीने चाहत्याने धोनीच्या पाया पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधी मोहाली येथे झालेल्या भारत विरुद्ध श्रीलंका या सामन्यात एक चाहता थेट मैदानात शिरला आणि त्याने धोनीचे पाय धरत आदर व्यक्त केला. या चाहत्यालाही पोलिसांनी नंतर दूर केले. तसेच, इंग्लंड विरुद्ध ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या सराव सामन्यात धोनी भारत अ संघातर्फे खेळत होता. त्यावेळी चाहता चक्क पीचपर्यंत पोहोचला आणि तो धोनीच्या पाया पडला.