रॉजर फेडरर व राफेल नदाल म्हणजे आधुनिक टेनिसचे खंदे शिलेदार. कलात्मकता आणि शैलीचे प्रतीक असलेला फेडरर, तर विजिगीषु वृत्ती आणि तडफदार खेळाचा मानकरी नदाल यांच्यात रंगणारी प्रत्येक लढत टेनिस चाहत्यांसाठी अव्वल दर्जाच्या खेळाची पर्वणी ठरते. नदालचा आयपीटीएलमध्ये समावेश झाल्यापासून फेडरर-नदाल द्वंद्वाचे पडघम वाजत आहेत. आयपीटीएल स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामातील बहुचर्चित अशी ही लढत शनिवारी होणार आहे.

यूएई रॉयल्सचे प्रतिनिधित्व करणारा फेडरर आणि इंडियन एसेसकडून खेळणारा नदाल एकमेव निर्णायक सेटमधील विजयासाठी समोरासमोर उभे ठाकणार आहेत. गुरुवारी यूएई रॉयल्सच्या लढतीच्या वेळी फेडरर अनुपस्थित होता. शुक्रवारी रॉयल्स संघाचा सामना नाही. यामुळे शनिवारच्या केवळ एका सामन्यासाठी फेडरर भारतभूमीवर अवतरणार आहे.
आयपीटीएलच्या पहिल्या हंगामात फेडरर इंडियन एसेस संघात होता. हाऊसफुल्ल गर्दीने फेडररचे दिमाखात स्वागत केले होते. चाहत्यांच्या प्रेमाला जागत फेडररने तिन्ही लढती जिंकत एसेसच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते. यंदा फेडरर यूएई रॉयल्स संघाकडून खेळणार आहे, तर प्रतिस्पर्धी नदाल इंडियन एसेस या भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. फेडरर आणि नदाल या दोघांचाही प्रचंड चाहतावर्ग भारतात आहे. आपल्या लाडक्या खेळाडूला ‘याचि देही, याचि डोळा’ पाहतानाच त्याला आवाजी पाठिंबा देण्यासाठी चाहते गर्दी करतील अशी अपेक्षा आहे.
दोन सार्वकालीन दिग्गजांमध्ये होणाऱ्या या मुकाबल्याची राजधानी दिल्लीत मोठय़ा प्रमाणावर जाहिरातबाजीही करण्यात आली आहे. पहिल्या हंगामाच्या तुलनेत आयपीटीएलची प्रेक्षक क्षमता मोठय़ा प्रमाणावर घटली आहे. किमान या लढतीच्या निमित्ताने चाहते इंदिरा गांधी स्टेडियमवर दाखल होतील अशी संयोजकांना आशा आहे. या दोघांमधील सर्व प्रकारच्या लढतींमध्ये नदाल २३-११ असा आघाडीवर आहे. मात्र आयपीटीएलची लढत इनडोअर प्रकारात होणार आहे. इनडोअर प्रकारात फेडरर ५-१ आघाडीवर आहे. ‘लाल मातीचा राजा’ नदाल इनडोअर हार्ड कोर्टवर ‘ग्रास कोर्ट विशेषज्ञ’ फेडररचे आव्हान मोडून काढणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. सातत्यपूर्ण प्रदर्शन असूनही फेडररला तीन वर्षांत ग्रँड स्लॅम जेतेपदावर कब्जा करता आलेला नाही, तर दुखापतींनी वेढल्याने नदालला यंदा त्याच्या बालेकिल्ल्यात अर्थात फ्रेंच खुल्या स्पर्धेत धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. दुखापतीतून सावरलेला नदाल चिरतरुण फेडररचा विजयरथ रोखण्यासाठी आतुर आहे. पुढच्या महिन्यात होणाऱ्या वर्षांतल्या पहिल्या ग्रँड स्लॅम अर्थात ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत हे दोघेही एकमेकांविरुद्ध येण्याची शक्यता आहे. त्या ऐतिहासिक द्वंद्वाची झलक दिल्लीकरांना अनुभवता येणार आहे.

इंडियन ऐसेसचा विजयरथ सुसाट

गतविजेत्या इंडियन एसेसने जपान वॉरियर्सला २६-२१ असे नमवले. सानिया मिर्झा-रोहन बोपण्णाने पिआर ह्य़ुज हरबर्ट-बारोनी- ल्युकिक जोडीवर ६-४ असा विजय मिळवला. अ‍ॅग्निझेस्का रडवानस्काने कुरुमी नाराचा ६-२ असा धुव्वा उडवला. तिसऱ्या लढतीत जपानच्या लिएण्डर पेस- पिआर ह्य़ुज हरबर्ट जोडीने इंडियन ऐसेसच्या रोहन बोपण्णा- इव्हान डोडिग जोडीवर शूटआऊटमध्ये ६-५ अशी मात केली. लिजंड्स एकेरीत ऐसेसच्या फॅब्रिस सँटोरोने जपानच्या थॉमस एन्क्व्सिटला ६-३ असे नमवले. पाचव्या आणि अंतिम लढतीत जपानच्या पिआर ह्य़ुज हरबर्टने इंडियन ऐसेसच्या इव्हान डोडिगचा ६-३ असा पराभव केला. सिंगापूर स्लॅमर्सने फिलिपाइन्स मॅव्हरिक्सवर ३०-२२ असा विजय मिळवला.