फुटबॉल वर्ल्डकप २०२२ आणि आशिया कप २०२३च्या पात्रता स्पर्धेमध्ये भारतीय संघाने बांगलादेशला २-० अशी मात दिली. संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने हे दोन्ही गोल करत बांगलादेशचा फडशा पाडला. या विजयासह छेत्रीने अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला मागे टाकत अवघ्या फुटबॉलविश्वाचे लक्ष आपल्याकडे ओढून घेतले. वर्ल्डकप पात्रता स्पर्धेत परदेशात २० वर्षांनी भारताला हा पहिला विजय मिळवता आला.

७९व्या मिनिटाला संघाचे खाते उघडल्यानंतर सुनील छेत्रीने या गट ईच्या सामन्यात अतिरिक्त वेळेत आणखी एक गोल नोंदवून संघाचा विजय निश्चित केला. यासह ३६ वर्षीय छेत्रीने आपली आंतरराष्ट्रीय गोल संख्या ७४ अशी केली आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील सक्रिय खेळाडूंमध्ये पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो १०३ गोलसह प्रथम स्थानी आहे. तर मेस्सी ७२ गोलसह तिसऱ्या स्थानी आहे.

हेही वाचा – IPL २०२१चं वेळापत्रक झालं जाहीर..! ‘या’ खास दिवशी होणार अंतिम सामना

 

 

मेस्सीचा चिलीविरुद्ध ७२वा गोल

सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत छेत्री ११व्या स्थानावर पोहोचला आहे. दहाव्या क्रमांकावर त्याच्या पुढे तीन खेळाडू आहेत. हंगेरीचा सेंडर कोक्सिस, जपानचा कुनिशिगे कामटो आणि कुवेतचा बशर अब्दुल्ला यांच्या नावावर प्रत्येकी ७५ गोल आहेत. सुनील छेत्रीच्या मागे असलेल्या यूएईच्या अलीने गेल्या आठवड्यात मलेशियाविरुद्ध ७३वा गोल नोंदवला होता, तर मेस्सीने चिलीविरुद्ध ७२वा गोल केला.

हेही वाचा – एका भारतीय व्यक्तीची वार्षिक कमाई म्हणजे रोहित शर्माचे ‘इतक्या’ तासांचे उत्पन्न!

यापूर्वी भारताला ३ जून रोजी आशिया चॅम्पियन कतारविरुद्ध ०-१ असा पराभव पत्करावा लागला होता. भारताला आता १५ जूनला अफगाणिस्तानविरुद्ध सामना खेळायचा आहे. बांगलादेशने शेवटच्या क्षणापर्यंत बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आले नाही. २०२२च्या वर्ल्डकप स्पर्धेतून भारत आधीच बाहेर पडला आहे.