इंग्लंड फुटबॉल संघाचे मुख्य मैदान असणाऱ्या वेम्ब्ले येथे प्रथमच प्रेक्षकांशिवाय पुढील महिन्यात ‘एफ ए’ चषकाच्या उपांत्य आणि अंतिम फेरीच्या लढती होणार आहेत. त्यातच करोनामुळे आर्थिक संकट आलेल्या इंग्लंड फुटबॉल संघटनेकडूनही ८२ कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे. ४२ कर्मचाऱ्यांची भरती याआधीच करोनामुळे थांबण्यात आली होती आणि आता त्यात कर्मचारी कपातीची भर पडली आहे.

अनेक स्पर्धा लांबणीवर पडल्याने इंग्लंड फुटबॉल संघटनेला सध्या एकूण ३७ कोटी डॉलर्सचा फटका बसला आहे. ‘एफ ए’ चषकाच्या उपांत्य आणि अंतिम फेरीच्या लढती पुढील महिन्यात वेम्ब्ले येथे प्रेक्षकांशिवाय होणार आहेत. २००७मध्ये या मैदानाचे नूतनीकरण करण्यात आल्यानंतर प्रथमच प्रेक्षकांशिवाय सामने होणार आहेत. वेम्ब्लेवर युरो चषकातील सात लढती होणार होत्या. मात्र ही स्पर्धाही थेट पुढील वर्षी होणार आहे. ‘‘करोनामुळे आमचे मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. पुढील काही वर्षे हे आर्थिक संकट कायम असेल. सामाजिक अंतराचे नियम असताना येत्या काही महिन्यांत किती प्रेक्षकांना मैदानात प्रवेश देता येईल हेदेखील ठाऊक नाही,’’ असे इंग्लंड फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष ग्रेग क्लार्क म्हणाले.