महिला विश्वचषक हॉकी स्पर्धा शनिवारीपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतासह सर्व सहभागी संघ लंडनमध्ये दाखल झाले आहेत. या संघाचे स्पर्धा सुरु होण्यापूर्वी एक फोटोशूट करण्यात आले. विविध संघाच्या कर्णधारांना या फोटोशूटमध्ये सहभागी करून घेण्यात आले होते. मात्र या फोटोशूटमध्ये आयोजक असलेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाकडून गोंधळ घालण्यात आला आहे. फोटोशूट दरम्यान भारताच्या ध्वजावरून अशोक चक्रच गायब करण्याचा ‘पराक्रम’ महासंघाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय हॉकीप्रेमी कमालीचे नाराज झाल्याचे दिसत आहे.

थेम्स नदीच्या किनाऱ्यावर हे फोटोशूट करण्यात आले आहे. सर्व कर्णधारांना या फोटोशूटसाठी बोलावण्यात आले होते. यावेळी प्रत्येक देशाच्या ध्वजाचे एक प्रतीकात्मक रूप बनवण्यात आले होते. त्यावेळी भारताच्या ध्वजामध्ये अशोक चक्रच नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांनी याबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. आयोजकांनी सर्व देशांच्या झेंड्याचे प्रतीक थेम्सच्या नदी किनारी अंडाकृती आकारात ठेवले होते. या ध्वजापुढे उभे राहून प्रत्येक कर्णधाराचा फोटो काढण्यात आला.

या नंतर सर्व कर्णधारांचा एकत्रितपणेही फोटो काढण्यात आला आणि विश्वचषकही तेथे ठेवण्यात आला होता. मात्र भारताच्या झेंड्यामधून अशोक चक्र गायब झाल्याची माहिती आयोजकांना देण्यात आली आहे की नाही, ही बाब अजून स्पष्ट झालेले नाही.