शिवछत्रपती क्रीडानगरीने आपल्या देशाला अनेक ऑलिम्पिकपटू दिले असून त्यांची काळजी आम्हाला आहे त्यामुळेच आम्ही येथील प्रशिक्षण अकादमींबरोबर पाच वर्षांचा करार करीत खेळाडूंमधील अनिश्चितता दूर करणार आहोत, असे राज्याचे क्रीडा मंत्री पद्माकर वळवी यांनी सांगितले.
क्रीडानगरीत टेनिस, नेमबाजी, टेबल टेनिस व बॅडमिंटन या खेळांच्या अकादमी सुरू आहेत. या अकादमींना नुकतीच राज्य शासनाने पत्र पाठवून या अकादमींबरोबर केलेला करार रद्द केल्याचे व १ एप्रिल २०१३ पासून अकादमी बंद करण्यात येणार असल्याचे कळविले होते. त्यामुळे शनिवारी टेनिस अकादमी चालविणारे महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे प्रतिनिधी, तसेच बॅडमिंटन अकादमीचे संचालक निखिल कानेटकर, टेबल टेनिस अकादमीचे संचालक भूषण सिंग ठाकूर, ‘गन फॉर ग्लोरी’ नेमबाजी अकादमीचे संचालक पवनकुमार सिंग यांनी क्रीडामंत्री वळवी यांची पुण्यात भेट घेतली. वळवी यांनी याबाबत त्वरित लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे.
वळवी  म्हणाले, ‘‘अकादमींबरोबर केलेला करार रद्द करण्याचा निर्णय राज्याचे क्रीडाआयुक्त पंकजकुमार यांनी स्वत:च्या अधिकारात घेतला होता. वास्तविक असा निर्णय घेण्यासाठी शासनाची उच्चस्तरीय व्यवस्थापन समिती आहे. त्यामध्ये राज्याचे क्रीडासचिव, क्रीडाआयुक्त यांच्यासह काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. या समितीला न विचारताच त्यांनी हा निर्णय घेतला होता. हा करार रद्द केल्याचा निर्णय घेतल्याचे कळताच मी तातडीने येथे आलो आणि संबंधित अकादमींच्या संचालकांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले. अकादमींबरोबर केलेला पाच वर्षांचा करार कायम राहील, असा ठराव मी तातडीने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करून घेणार आहे. बालेवाडीतून यापुढेही अनेक ऑलिम्पिक पदकविजेते घडावेत, अशी आमची भूमिका आहे.’’
शिवछत्रपती पुरस्कारांचे वितरण महाराष्ट्र दिनाआधी
शिवछत्रपती पुरस्काराची रक्कम वाढविण्याबाबत नुकताच शासकीय ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे नव्याने आम्ही अर्ज मागविले आहेत. पुरस्कारार्थीची निवड करण्यासाठी पद्मश्री, अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा समावेश असलेली समिती लवकरच स्थापन केली जाणार आहे. एक दोन महिन्यात गेल्या तीन वर्षांमधील पुरस्कार विजेत्यांची नावे घोषित करून त्याचे वितरणही केले जाईल. महाराष्ट्र दिनापूर्वीच हा समारंभ होईल, असे क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.