देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वैद्यकीय उपकरण, ऑक्सिजन याची उणीव भासत आहे. तसेच रुग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण वाढू लागला आहे. अत्यवस्थ असलेल्या रुग्णांची रुग्णालयाबाहेर रांग लागली आहे. अनेकांना बेड मिळत नाही. त्यामुळे अनेकांना उपचाराअभावी प्राण गमवावे लागत आहेत. दुसरीकडे, देशात इंडियन प्रीमियर लीग खेळवली जात आहे. देशात मोठे संकट असताना ही स्पर्धा कशासाठी, हा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता. आता ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अॅडम गिलख्रिस्टनेही यासंदर्भात एक ट्विट केले आहे.

गिलख्रिस्ट ट्विटमध्ये म्हणाला, ”भारताला माझ्या शुभेच्छा. भीतीदायक करोनाची वाढती संख्या. आयपीएल सुरू आहे. बरोबर आहे का हे? किंवा प्रत्येक रात्री तुम्ही विचलित होता का? आपले विचार काहीही असले तरी प्रार्थना आपल्याबरोबर आहेत.”

 

गिलख्रिस्टपूर्वी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरनेही एक ट्विट केले होते. अख्तरने भारतातील लोकांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत. तो म्हणाला, ”भारत खरोखर करोनाशी लढत आहे. जागतिक समर्थनाची गरज आहे. आरोग्य सेवा यंत्रणा क्रॅश होत आहे. हा एक साथीचा रोग आहे, आपण सर्व यात एकत्र आहोत. आपण एकमेकांचा आधार बनलो पाहिजे.”

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे सांत्वन करणारे ट्वीट केले आहे. ”करोनाच्या संकटात सापडलेल्या भारतातील नागरिकांच्या संवेदना समजू शकतो. या करोनामुळे पीडित शेजारी आणि जगभरातील लोकांसाठी आम्ही प्रार्थना करतो. ते लवकर बरे व्हावे. माणुसकीच्या नात्याने या जागतिक संकटाला तोंड देणे आवश्यक आहे”, असे ट्विट पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले आहे.