ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नवर लंडनमध्ये एका अभिनेत्रीला धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शनीवारी रात्री सेंट्रल लंडन परिसरातील एका बारमध्ये ही घटना घडल्याचं बोललं जातंय. वॅलरी फॉक्स असं या अभिनेत्रीचं नाव आहे. घटनास्थळावरील उपस्थित लोकांनी दिलेल्या माहितीनूसार शेन वॉर्नने वॅलरी फॉक्सच्या चेहऱ्यावर मारल्याचंही म्हणलंय.

हा प्रकार घडल्यानंतर, या अभिनेत्रीने पोलिसांमध्ये याची तक्रार दाखल केली असून, आपल्या ट्विटर अकाऊंटवरुनही तीने या घटनेची माहिती दिली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आपली चौकशी सुरु केली असून, ज्या जागी ही घटना घडली तिकडचं सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या प्रकरणी शेन वॉर्नला अद्यापही अटक मात्र झालेली नाहीये. एखाद्या महिलेवरुन अडचणीत येण्याची शेन वॉर्नची ही पहिलीच वेळ नाही. शेन वॉर्न आणि त्याची पत्नी सिमॉन यांच्यात वैय्यक्तीक कारणांवरुन घटस्फोट झाला होता. तसेच ब्रिटीश अभिनेत्री एलिजाबेथ हर्ली हिच्याशी ३ वर्ष रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर दोघही वेगळे झाले होते.

शेन वॉर्न सध्या स्काय स्पोर्ट्स या वाहिनीसाठी इंग्लंडमध्ये समालोचकाचं काम पाहतोय. सध्या पोलिस या प्रकरणाची चौकशी करत असून यात दोषी आढळल्यास शेन वॉर्नवर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.