जवळपास चार दशकांपासून कीर्ती महाविद्यालयाचे बॉक्सिंग गुरू आणि राज्याचे पहिले शिवछत्रपती पुरस्कार विजेते बॉक्सर जयवंत मोरे यांचे शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

दिवंगत रूसी इंजिनीयर यांनी घडविलेल्या जयवंत मोरे हे बडी डिसूझा आणि सॅमी खटाव यांच्या तालमीत घडले. १९६२ ते १९८४ पर्यंतचा काळ जयवंत मोरे यांनी गाजवला. बेडर, चपळता आणि अप्रतिम पदलालित्य तसेच तंत्रशुद्ध बॉक्सिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या जयवंत मोरे यांनी तब्बल ११ वर्षे अखिल भारतीय रेल्वे अजिंक्यपद स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला. तसेच सर्वोत्तम तंत्रशुद्ध बॉक्सरचा किताब त्यांनी १६ वेळा मिळवला होता.

फ्लायवेट गटात खेळणारे आणि जेमतेम ३८ किलो वजन असलेले मोरे स्पर्धेदरम्यान केळी खाऊन आपले वजन वाढवत; पण त्यांची चपळता आणि पदलालित्य पाहून भलेभले प्रतिस्पर्धी थक्क होत. प्रतिस्पध्र्याच्या चुका हेरून अचूक ठोसे लगावण्यात त्यांचा हातखंडा होता. आपल्या भक्कम बचावाच्या जोरावर ते कोणत्याही प्रतिस्पध्र्याला वरचढ ठरण्याची संधी देत नसत. ६०च्या दशकात सिद्धार्थ महाविद्यालयाकडून मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मोरे यांनी अखिल भारतीय विद्यापीठाच्या स्पर्धा गाजवल्या होत्या.

जवळपास पाच दशके प्रशिक्षक म्हणून कारकीर्द बजावणाऱ्या जयवंत मोरे यांनी राष्ट्रीय स्तरावरील अनेक चांगले बॉक्सर घडवले.