भारतात सध्या आयपीएलचा १४वा हंगाम सुरू आहे. या पर्वादरम्यान एक दु:खद बातमी समोर आली आहे. हैदराबाद संघाचा माजी वेगवान गोलंदाज अश्विन यादवचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले असा परिवार आहे.

अश्विन यादवची कारकीर्द

२००७मध्ये पंजाबविरुद्ध मोहालीमध्ये रणजी करंडक स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या यादवने १४ प्रथम श्रेणी सामन्यांत ३४ बळी घेतले होते. २००८-०९च्या हंगामात त्याने उप्पल स्टेडियमवर दिल्लीविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी केली होती. या सामन्यात त्याने ५२ धावा देऊन ६ बळी घेतले.

२००९मध्ये यादवने मुंबईविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. यानंतर त्याने स्टेट बँक ऑफ हैदराबाद आणि त्यानंतर एसबीआयच्या स्थानिक लीगमध्ये खेळणे सुरू ठेवले. त्याने १० लिस्ट ए आणि दोन टी-२० सामने खेळले. ३३ वर्षीय अश्विन यादवच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. भारतीय क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांनी यादवच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

 

“अश्विन यादवच्या निधनाचे वृत्त ऐकून वाईट वाटले. तो खूप आनंदी आणि पूर्णपणे ‘टीम मॅन’ होता. त्याच्या कुटुंबाला ही घटना पचवण्याची शक्ती द्यावी अशी मी देवाकडे प्रार्थना करीन. ओम शांती. तुझी आठवण येईल”, असे श्रीधर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.