करोनासारख्या भयंकर विषाणू संसर्गाच्या काळात चेंडूला लकाकी आणण्यासाठी लाळेच्या वापरावरील बंदी समजू शकतो. मात्र कोणत्याही मालिकेला सुरुवात होण्याआधी खेळाडूंची करोना चाचणी घेण्यात यावी. त्यात सर्व खेळाडूंचा अहवाल नकारात्मक आल्यास, चेंडूला लाळ लावण्याची परवानगी देण्याबाबत क्रिकेटच्या प्रशासकांनी विचार करावा, अशी विनंती भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरने केली आहे.

क्रिकेटमध्ये चेंडूला लाळ लावण्याबाबतचे महत्त्व विशद करताना आगरकर म्हणाला की, ‘‘फलंदाजांसाठी बॅट जितकी महत्त्वाची आहे, तितके च वेगवान गोलंदाजांसाठी चेंडूला लकाकी आणण्यासाठी लाळेचा वापर महत्त्वाचा आहे.’’ इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात ८ जुलैपासून सुरू होणाऱ्या करोनानंतरच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिके पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) चेंडूला लाळ लावण्यावर बंदी घातली आहे.

‘‘मालिके ला सुरुवात होण्याआधी सर्व खेळाडूंची करोना चाचणी करण्यात यावी, इतके च माझे म्हणणे आहे. त्यांचा करोनाबाबतचा अहवाल नकारात्मक आल्यास, ते सुरक्षित आहेत असे समजून चेंडूला लाळ लावण्याबाबत परवानगी देण्यात यावी. हे माझे मत असून वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञमंडळी याबाबत अधिक सविस्तर तपशील देऊ शकतील,’’ असे ४२ वर्षीय आगरकर म्हणाला.

‘आयसीसी’ आणि त्यांची वैद्यकीय समिती सद्यपरिस्थितीचे आकलन करून योग्य तो निर्णय घेतील, अशी आशा आहे. सध्याच्या परिस्थितीत त्यांच्यासमोर अन्य कोणताही पर्याय नसल्यामुळेच त्यांनी चेंडूला लाळेचा वापर करण्यावर बंदी घातली आहे, याची मला कल्पना आहे, असेही आगरकरने नमूद केले. ‘‘चेंडूला लकाकी आणणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी लाळेशिवाय अन्य कोणताही दुसरा पर्याय नाही. आयसीसी आणि त्यांची वैद्यकीय समिती यांनी योग्य अभ्यास करूनच निर्णय घेतला आहे. आयसीसीने घेतलेला सावध पवित्रा समजण्याजोगा आहे. त्यामुळे इंग्लंड दौरा संपेपर्यंत आपल्याला या निर्णयात सुधारणा करता येईल का, याची वाट पाहावी लागेल. पण चेंडूला थुंकी लावल्याशिवाय बळी मिळवणे गोलंदाजांसाठी अवघड जाईल,’’ असे आगरकरने सांगितले.

क्रिकेट हा खेळ फलंदाज धार्जिणा असून लाळेच्या वापरावरील बंदीमुळे वेगवान तसेच मध्यमगती गोलंदाजांसाठी आव्हानात्मक काळ आहे, असे आगरकर म्हणाला.