भारताच्या फुटबॉल संघाचे माजी कर्णधार कार्लटन चॅपमन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने बेंगळूरु येथे सोमवारी पहाटे निधन झाले. ते ४९ वर्षांचे होते. बायचुंग भूतिया, आय. एम. विजयन आणि चॅपमन असे त्रिकूट १९९०च्या दशकात प्रसिद्ध होते.

छातीत दुखू लागल्याने चापमन यांना रविवारी रात्री बेंगळूरुतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र पहाटे त्यांचे निधन झाले. मध्यरक्षक म्हणून गुणवत्ता सिद्ध केलेल्या चॅपमन यांनी भारताचे १९९५ ते २००१ या काळात प्रतिनिधित्व केले. १९९०च्या सुरुवातीला टाटा फुटबॉल अकादमीकडून त्यांची कारकीर्द सुरू झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने १९९७ मध्ये सॅफ चषक पटकावला होता.

चॅपमन यांनी ईस्ट बंगालकडूनही १९९३-९५ या दोन हंगामांमध्ये क्लब स्तरावर खेळताना प्रभाव पाडला होता. १९९५ पासून जेसीटी मिल्स संघाकडून त्यांची कारकीर्द विशेष गाजली. याच संघाकडून भूतिया, विजयन आणि चॅपमन हे त्रिकूट गाजले. पंजाबस्थित जेसीटी मिल्स संघाने जिंकलेल्या १४ फुटबॉल स्पर्धामध्ये चॅपमन यांनी योगदान दिले. १९९६-९७ मध्ये झालेली पहिलीवहिली नेशन्स फुटबॉल लीग जेसीटीने जिंकण्यात चॅपमन, भूतिया आणि विजयन या त्रिकुटाचे योगदान मोलाचे राहिले.

चॅपमन यांनी एक हंगाम एफसी कोचीन या संघाचेही प्रतिनिधित्व केले होते. तेथून ते १९९८ मध्ये पुन्हा ईस्ट बंगाल संघाकडे परतले. चापमन यांच्या नेतृत्वाखाली ईस्ट बंगालने २००१ मध्ये नेशन्स फुटबॉल लीगचे विजेतेपद पटकावले. त्यांनी २००१ मध्ये व्यावसायिक फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली. खेळातून निवृत्त झाल्यावर ‘आय-लीग’मधील दुसऱ्या श्रेणीच्या काही संघांचे प्रशिक्षकपदही त्यांनी सांभाळले होते.

चॅपमन हे माझ्यासाठी लहान भावाप्रमाणे होते. आमचे एक कुटुंबच होते. त्यांची उणीव भरून काढणे सोपे नाही. मैदानावर आणि मैदानाबाहेर एक व्यक्ती म्हणूनही ते खूप चांगले होते. फुटबॉलपटू हा मैदानावर नेहमी संतापतोच मात्र चॅपमन यांना मैदानावर मी कधीही रागावलेले पाहिले नाही.

– आय. एम. विजयन, भारताचे माजी फुटबॉलपटू