आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर माजी क्रिकेटपटू आशिष नेहरा नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे. भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेत आशिष नेहरा समालोचन करणार असून वीरेंद्र सेहवाग त्याला साथ देणार आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी- २० सामन्यानंतर आशिष नेहराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. निवृत्तीनंतर समालोचन करणार असे संकेतही नेहराने दिले होते. निवृत्तीनंतर काही दिवस आराम करणार, त्यानंतर आपण प्रशिक्षण किंवा समालोचन या क्षेत्रात काम करणार असल्याचे नेहराने स्पष्ट केले होते. बुधवारी ‘स्टारस्पोर्ट्स’ने ट्विटरवरुन आशिष नेहरा पहिल्या कसोटी सामन्यात समालोचन करणार असल्याची माहिती दिली. १६ नोव्हेंबरपासून भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात कोलकाता येथील ईडन गार्डन स्टेडियममध्ये पहिला कसोटी सामना रंगणार आहे. या सामन्यात समालोचन कक्षात वीरेंद्र सेहवागच्या जोडीला आशिष नेहरा असेल, असे स्टारस्पोर्ट्सने ट्विटरवर म्हटले आहे.

वीरेंद्र सेहवाग आणि आशिष नेहराची मैत्री सर्वश्रृत आहे. या दोघांनी क्रिकेटचे प्रशिक्षण एकत्रच घेतले. नेहरा आणि सेहवागने दिल्लीकडून रणजीत पदार्पण केले होते. २००३ आणि २०११ मधील वर्ल्डकपमध्येही दोघेही भारतीय संघात होते. सेहवागनेही ट्विटरवरुन नेहराला नव्या इनिंगसाठी खास त्याच्या शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत.

नेहरा तब्बल १८ वर्ष क्रिकेटच्या मैदानात होता. १७ कसोटी सामन्यांमध्ये नेहराने ४४ विकेट्स घेतल्या आहेत. तर १२० वन डे सामन्यांमध्ये त्याने १५७ विकेट्स घेतल्या आहेत.