रुपिंदर पाल सिंगने दोन गोल करुनही भारतीय पुरुष संघाला चार देशांच्या निमंत्रितांच्या हॉकी स्पर्धेतील पहिल्या लढतीत ऑस्ट्रेलियाकडून २-३ अशी हार पत्करावी लागली.

अव्वल दर्जाच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने सकारात्मक खेळ केला. सामन्याच्या २१व्या मिनिटाला भारतास मिळालेल्या तिसऱ्या पेनल्टी कॉर्नरचे रुपिंदरने गोलमध्ये रुपांतर केले. परंतु तीन मिनिटांनी ऑस्ट्रेलियाच्या जेरेमी हेवर्डने अप्रतिम कौशल्य दाखवत गोल केला व १-१ अशी बरोबरी साधली. मध्यंतराला हीच बरोबरी होती.

हेवर्डने पुन्हा सामन्याच्या ३६व्या मिनिटाला गोल केला व संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.  ट्रेन्ट मिटॉनने ४३व्या मिनिटाला संघाचा तिसरा गोल केला. त्यानंतर त्यांच्या खेळाडूंनी केलेल्या दोन-तीन चाली भारताचा गोलरक्षक आकाश चिकटेने शिताफीने परतवल्या. सामन्याच्या ५३व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली. त्याचा फायदा घेत रुपिंदरने गोल करीत सामन्यातील रंगत वाढवली. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी सातत्याने चाली केल्या. पण ऑस्ट्रेलियन बचावरक्षकांनी या चाली हाणून पाडल्या. भारताची गुरुवारी मलेशियाबरोबर गाठ पडणार आहे.

 

उपउपांत्यपूर्व फेरीत लिसेस्टरची रिअलशी गाठ पडणार

पॅरिस : लिसेस्टरने बेल्जियमच्या क्लब ब्रुग्गेचा २-१ असा पराभव करून चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पध्रेची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्याचा रिअल माद्रिदशी सामना होणार आहे. याशिवाय ज्युव्हेंट्स बायर लेव्हेक्र्युसेन आणि मोनॅको या संघांनी बाद फेरी गाठली आहे. गतवर्षीचे उपविजेते अ‍ॅटलेटिको माद्रिद, अर्सेनल, पॅरिस सेंट-जर्मेन, बायर्न म्युनिक आणि बोरुसिया डॉर्टमंड या संघांचे साखळीतील दोन सामने शिल्लक असतानाच त्यांनी बाद फेरीतील स्थान निश्चित केले आहे.

ग-गटातून लिसेस्टरने गटविजेत्याच्या थाटात बाद फेरी गाठली. शिनजी ओकाझाकीने पाचव्या मिनिटाला लिसेस्टरचे खाते उघडले, मग रियाद माहरेझने ३०व्या मिनिटाला आणखी एक गोलची नोंद करीत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. ब्रुग्गेकडून जोस इझक्वेडरेने एकमेव गोलची नोंद केली. ई-गटात मोनॅकोने टॉटरहॅमचा २-१ असा धक्कादायक पराभव केला. मोनॅकोकडून डिब्रिल सिडीबे आणि थॉमसन लेमार यांनी गोल साकारले, तर टॉटरहॅमकडून हॅरी केनने गोल केला.