उत्तेजक प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारताची राष्ट्रकुल अजिंक्यपद रौप्यपदक विजेती वेटलिफ्टिंगपटू सीमावर चार वर्षे बंदीची कारवाई करण्यात आली आहे.

विशाखापट्टणम येथे झालेल्या महिलांच्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान सीमाचे उत्तेजक चाचणीचे नमुने घेण्यात आले होते. या नमुन्यांमध्ये बंदी असलेल्या उत्तेजक पदार्थाचे अवशेष सापडले होते. त्यामुळे तिने उत्तेजक प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केले आहे, अशी माहिती राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने (नाडा) दिली.

‘‘सीमाच्या विश्लेषणात्मक अहवालात हायड्रॉक्सी-४-मेथॉक्सी टेमॉक्सीफेन, सिलेक्टिव्ह एस्ट्रोजेन रीसेप्टर मोडय़ूलर मेटेनोलोन, अ‍ॅनाबोलिक स्टेरॉइड ऑस्ट्रेन, सिलेक्टिव्ह अँड्रोजेन रीसेप्टर मोडय़ूलर या जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने (वाडा) बंदी घातलेल्या पदार्थाचे अवशेष सापडले आहेत,’’ असे ‘नाडा’ने म्हटले आहे. ‘नाडा’च्या उत्तेजक प्रतिबंधक शिस्तपालन समितीने चार वर्षांच्या बंदीची शिक्षा तिला सुनावली आहे.

सीमाने २०१७मध्ये राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते, तर २०१८मध्ये झालेल्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.