भारत-इंग्लंड कसोटी मालिका

 

मोटेराच्या अनुकूल खेळपट्टीवर गुरुवारपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीत फिरकीच्या बळावर वर्चस्व गाजवून इंग्लंडविरुद्धची मालिका जिंकण्यापेक्षा लॉर्ड्सवर जागतिक कसोटी अजिंक्यपदाची अंतिम फेरी गाठण्याचे भारताचे लक्ष्य आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाकडे सध्या २-१ अशी आघाडी असून, जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठी न्यूझीलंडला भिडण्यासाठी अखेरची कसोटी किमान अनिर्णीत राखण्याची आवश्यकता आहे. भारतीय संघ या सामन्यात पराभूत झाल्यास ऑस्ट्रेलियाचा संघ अंतिम सामन्यासाठी थेट पात्र ठरेल.

सामना अनिर्णीत राखणे हा सुरक्षित पर्याय असला तरी आक्रमक वृत्तीच्या कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांना हा बचावात्मक पर्याय मुळीच मान्य नाही. मोटेरावर तिसऱ्या कसोटीत गुलाबी चेंडूनिशी खेळताना भारताने दोन दिवसांत इंग्लंडला नामोहरम केल्यानंतर खेळपट्टीवरून खडाजंगी रंगली. मालिकेतील अखेरचा सामना इंग्लंडने जिंकल्यास त्यांना प्रतिष्ठा टिकवता येईल, परंतु भारताने गमावल्यास मानहानीकारक ठरेल.

अश्विन-अक्षरचे वर्चस्व

पहिल्या तीन कसोटी सामन्यात इंग्लंडच्या ६० बळींपैकी ४९ बळी हे फिरकीच्या बळावर मिळालेले आहेत. यात रविचंद्रन अश्विन (२४ बळी) आणि अक्षर पटेल (१८ बळी) या जोडगोळीचे मालिकेवर प्रामुख्याने वर्चस्व आढळले. दोघांनी मिळून एकूण ४२ बळी मिळवले आहेत. अक्षर पटेलने सरळ चेंडू टाकले, परंतु फिरकीचे दडपण बाळगणाऱ्या इंग्लंडच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली. तशी चेन्नईच्या दुसऱ्या कसोटीपासूनच भारताने फिरकीचे चक्रव्यूह रचण्यात धन्यता मानली आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीप्रमाणेच चौथ्या कसोटीसाठीही खेळपट्टी असेल, असा दावा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि झ्ॉक क्रॉवली यांनी केला आहे. परंतु लाल चेंडू गुलाबी चेंडूपेक्षा कमी घसरतो, त्यामुळे उभय संघांत रंगतदार लढत होईल, अशी अपेक्षा आहे.

रोहितवगळता अन्य फलंदाजांकडून अपेक्षा

मायदेशातील खेळपट्टय़ांवर गोलंदाज कर्तृत्व गाजवत असताना फलंदाजांकडून मात्र निराशा होते आहे. मागील चार डावांत इंग्लंडची फलंदाजी अधिक निराशाजनक झाली, हेच भारतासाठी दिलासादायक ठरले. भारतीय फलंदाजांमध्ये रोहित शर्माने सर्वाधिक २९६ धावा केल्या आहेत. या यादीत दुसऱ्या स्थानावर अश्विन (१९६ धावा) आहे. चेपॉकमधील त्याचे शतक संस्मरणीय ठरले होते. या मालिकेत रोहितवगळता अन्य फलंदाज अपयशी ठरले आहेत. कोहलीने दोन अर्धशतके झळकावली आहेत. पण अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा व शुभमन गिल यांना एखाद्याच डावात लक्ष वेधता आले आहे.

उमेशच्या पुनरागमनाची शक्यता

अखेरच्या कसोटीत जसप्रित बुमरा अनुपलब्ध असल्याने इशांत शर्माच्या साथीला उमेश यादवला खेळवण्याची दाट शक्यता आहे. परंतु इशांतलाही  विश्रांती दिल्यास उमेशला मोहम्मद सिराजची साथ लाभेल. फिरकी त्रिकुटामध्ये अश्विन-अक्षरच्या साथीला वॉशिंग्टन सुंदर किंवा कुलदीप यादव यांच्यापैकी एकाचा पर्याय निवडावा लागेल.

रूटवर भिस्त; बेसचा समावेश?

खेळाडू व्यवस्थापन धोरण आणि खराब संघ निवड हे इंग्लंडच्या पराभवांसाठी प्रमुख कारण ठरले आहे. जो रूट (३३३ धावा) मालिकेत सातत्याने अष्टपैलूत्व सिद्ध करीत आहे. बेन स्टोक्सनेही (१४६) मालिकेत उत्तम फलंदाजी केली आहे. तिसऱ्या कसोटीत इंग्लंडची रणनीती चुकली. परंतु रूटनेच ८ धावांत ५ बळी घेत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. जॅक लीचच्या (१६ बळी) साथीला डॉम बेसचा समावेश केल्यास भारतीय फलंदाजांसाठी ते आव्हानात्मक ठरेल. चेन्नईच्या पहिल्या कसोटीत बेसने प्रभावी गोलंदाजी करूनही त्याला पुढील दोन कसोटींत डावलण्यात आले.

फिरकीच्या खेळपट्टीचे अवडंबर कशाला? – कोहली

फिरकीच्या खेळपट्टीचे अवडंबर कशाला माजवता? या चर्चा थांबवा आणि बचाव उत्तम करून चौथ्या कसोटीसाठी सज्ज व्हा, असे आव्हान कोहलीने इंग्लंड संघाला केले आहे. चेन्नईच्या तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचे डाव अनुक्रमे १३४ आणि १६४ धावांत गडगडले, तर अहमदाबादच्या तिसऱ्या कसोटीत इंग्लंड संघाने अनुक्रमे ११२ आणि ८१ धावांवर हाराकिरी पत्करली. त्यानंतर इंग्लंडच्या आजी-माजी क्रिकेटपटूंनी खेळपट्टीला दुषणे दिली. ‘‘चार-पाच दिवसांच्या संघर्षांनंतर कसोटी संपली असती, तर कुणी काहीच म्हटले नसते. परंतु तिसरी कसोटी दोन दिवसांत संपल्यामुळे भाष्य करण्याची संधी मिळाली. फिरकी खेळपट्टीवर खेळण्यासाठी फक्त स्वीपचे फटके नव्हे, तर बचाव उत्तम असायला हवा,’’ असे कोहलीने सांगितले.

कोहलीचे नेतृत्व पणाला

चौथ्या कसोटीत कोहलीचे नेतृत्व पणाला लागले आहे. महेंद्रसिंह धोनी हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) स्पर्धामधील यशस्वी कर्णधार असल्याचे भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार ठरलेल्या कोहलीनेही मान्य केले आहे. त्यामुळे ‘आयसीसी’ कसोटी अजिंक्यपद जिंकल्यास ते कोहलीच्या नेतृत्वाखालील पहिले यश ठरेल. २०१९मध्ये कोलकाता येथे बांगलादेशविरुद्ध कोहलीने अखेरचे शतक झळकावले आहे. त्यानंतर ११ डावांत त्याला शतकाने हुलकावणी दिली आहे. चालू मालिकेतही त्याने दोन अर्धशतके नोंदवली आहेत. आणखी एक शतक साकारल्यास तो कर्णधार म्हणून सर्वाधिक शतकांचा रिकी पॉटिंगचा (४१ शतके) मोडीत काढू शकेल.

६० कोहली महेंद्रसिंह धोनीच्या (६०) सर्वाधिक कसोटीत भारताचे नेतृत्व करण्याच्या विक्रमाची या सामन्यात बरोबरी साधेल.

१७कोहलीच्या खात्यावर कर्णधार म्हणून तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून ११,९८३ धावा जमा आहेत. आणखी १७ धावा केल्यास तो १२ हजार धावा पूर्ण करणारा रिकी पाँटिंग आणि ग्रॅमी स्मिथ यांच्यानंतर तिसरा कर्णधार ठरेल.

२२कोहलीने कर्णधार म्हणून मायदेशात २२ कसोटी सामने जिंकले आहेत. परंतु चौथी कसोटी जिंकल्यास कोहली स्टीव्ह वॉ याला मागे टाकून तिसऱ्या स्थानावर पोहोचेल.

३६कोहलीला कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधारांच्या यादीत संयुक्तपणे चौथे स्थान गाठता येईल. अखेरचा सामना जिंकल्यास कोहली क्लाइव्ह लॉइडच्या ३६ विजयांची बरोबरी करू शकेल.

संघ

* भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद  सिराज, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), मयांक अगरवाल, हार्दिक पंडय़ा, कुलदीप यादव, के. एल. राहुल.

* इंग्लंड : जो रूट (कर्णधार), जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, डॉमिनिक बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्‍स, झ्ॉक क्रॉवली, बेन फोक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ऑली पोप, डॉम सिब्ली, बेन स्टोक्स, ऑली स्टोन, ख्रिस वोक्स, मार्क वूड.

* वेळ : सकाळी ९.३० वा.

*  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १,  स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि एचडी वाहिन्या.