भारतीय बॅडमिंटनपटू एच.एस.प्रणॉय आणि साई प्रणीत यांनी पॅरिस येथे सुरु असलेल्या प्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. एच.एस.प्रणॉयने काही दिवसांपूर्वी डेन्मार्क ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचलेल्या कोरियाच्या ली ह्यूनचा २१-१५, २१-१७ अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. ह्यूनला डेन्मार्क ओपनच्या अंतिम फेरीतही किदम्बी श्रीकांतकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला. तर दुसरीकडे साई प्रणीतने थायलंडच्या खोसीत फेत्प्रादबची झुंज २१-१३, २१-२३, २१-१९ अशी मोडून काढली. पुढच्या फेरीत साई प्रणीतला तुल्यबळ प्रतिस्पर्ध्याचा सामना करावा लागणार आहे. साई प्रणीतला पुढच्या फेरीत जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या मलेशियाच्या ली चोंग वी शी सामना करायचा आहे. तर प्रणॉयसमोर डेन्मार्कच्या क्रिस्टन सोलबर्गचं आव्हान असणार आहे.
एच.एस.प्रणॉयने आपल्या प्रतिस्पर्ध्यावर सहज मात करत पुढच्या फेरीत प्रवेश केला. मात्र साई प्रणीतला आपल्या विजयासाठी चांगलच झुंजाव लागलं. भारतीय पुरुष बॅडमिंटनपटूंना एकेरी सामन्यात यश आलं असलं तरीही दुहेरी सामन्यात भारताला आपला गाशा गुंडाळावा लागला आहे. प्रणव चोप्रा आणि एन. सिकी. रेड्डी या जोडीला पहिल्यात फेरीत इंडोनेशियाच्या जोडीकडून १५-२१, १२-२१ असा पराभव पत्करावा लागला.
तर महिलांमध्ये सायना नेहवालनेही आपल्या डेन्मार्कच्या प्रतिस्पर्धी खेळाडूचा २१-१४, ११-२१, २१-१० अशा तीन सेट्समध्ये पराभव केला. पहिल्या सेटमध्ये सायनाने आपली प्रतिस्पर्धी लीनला सामन्यात डोकं वर काढण्याची संधीत दिली नाही. मात्र दुसऱ्या सेटमध्ये लीनने आक्रमक खेळ करत सायनाला धक्का देत सामन्यात रंगत आणली. दुसऱ्या सेटमध्ये लीनने सायनाला १० गुणांच्या फरकाने हरवल्यामुळे, सायनाला पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागतो की काय असं वाटतं होतं, मात्र तिसऱ्या सेटमध्ये सायनाने दमदार पुनरागमन करत २१-१० अशी बाजी मारत पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला.