भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या टी २० मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे पूर्णपणे वाया गेला. त्यामुळे आता मालिका जिंकण्यासाठी उर्वरित दोनही सामने जिंकणे दोनही संघांना आवश्यक असणार आहे. त्यातच आफ्रिकेच्या संघाची विश्वचषक स्पर्धा २०१९ मधील कामगिरी अत्यंत सुमार होती. त्यामुळे आफ्रिकेच्या संघात नेतृत्वबदल करण्यात आला असून यष्टीरक्षक क्विंटन डी कॉककडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याच्या कामगिरीकडे साऱ्यांचेच लक्ष असणार आहेत. तशातच क्विंटन डी कॉकच्या खेळीत दिग्गज फलंदाज ब्रायन लारा आणि कुमार संगाकारा यांची झलक दिसते, असे मत माजी सलामीवीर गौतम गंभीर याने व्यक्त केले आहे.

क्विंटन डी कॉक

 

“दक्षिणत आफ्रिकेच्या भारत दौऱ्याबाबत बोलायचे झाले तर विश्वचषकातील खराब कामगिरीनंतरचा हा आफ्रिकेच्या संघाचा पहिलाच दौरा आहे. मला क्विंटन डी कॉक आवडतो. तो अशा डावखुऱ्या फलंदाजांपैकी एक आहे, ज्याच्यासारखा खेळ करण्याची माझीही इच्छा होती, पण मला ते जमू शकलं नाही. तो जेव्हा सर्वोत्तम खेळ करत असतो, तेव्हा मला त्याच्यात कुमार संगाकारा आणि ब्रायन लारा या दोघांची झलक दिसते. त्याच्यावर सध्या कर्णधारपदाची नवी जबाबदारी दिली आहे. त्याला त्याच्या नव्या जबाबदारीत यश मिळावे असे मला मनापासून वाटतं, पण त्याचा परिणाम त्याच्या फलंदाजीवर होऊ नये”, अशी आशा गंभीरने व्यक्त केली.

“दक्षिण आफ्रिकेची नव्याने संघबांधणी सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या या संघाविरोधात भारतातील युवा खेळाडूंना संधी मिळू शकते. नव्या युवा खेळाडूंना संघातील आपले स्थान पक्के करण्यासाठी ही एक सुवर्णसंधी असणार आहे”, असेही गंभीर म्हणाला.