पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने आपल्या आत्मचरित्रामध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सलमीचा फलंदाज गौतम गंभीरवर टिका केली आहे. गंभीरकडे व्यक्तीमत्वच नसून तो खूप अहंकारी आहे अशी टिका आफ्रिदीने आपल्या ‘गेम चेंजर’ या आत्मचरित्रामध्ये केली आहे. आफ्रिदीने या पुस्तकामध्ये आपल्या खऱ्या वयाचा खुलासा केल्याने मागील काही दिवसांपासून हे पुस्तक चांगलेच चर्चेत आहे.

गंभीरबरोबरच्या नात्याचा खुलासा आफ्रिदीने या आत्मचरित्रात केला आहे. गंभीरबद्दलचा सगळा राग त्याने आपल्या लिखाणातून व्यक्त केला आहे. आफ्रिदी आपल्या आत्मचरित्रामध्ये म्हणतो, ‘काहीजणांशी खाजगी शत्रूत्व असतं तर काही जणांशी कामाशीसंदर्भात. मात्र गंभीरबद्दल वेगळचं होतं. गंभीर एकदमच विचित्र आहे. गंभीर आणि त्याचा अहंकार काय बोलणार याबद्दल. गंभीरकडे व्यक्तीमत्वच नाही. क्रिकेटसारखा महान खेळ खेळणाऱ्या गंभीरकडे व्यक्तीमत्वच नाहीय. त्याच्या नावावर विक्रमही नाहीत त्याच्याकडे आहे तो केवळ अहंकार.’

गंभीर एक खेळाडू म्हणून सतत नकारात्मक्ता घेऊन मैदानात वावरायचा अशी टिकाही आफ्रिदीने या पुस्तकातून केली आहे. ‘गंभीर हा डॉन ब्रॅडमन आणि जेम्स बॉण्ड या दोघांचे थोडे थोडे गुण असल्यासारखा वागायचा. अशा लोकांना आम्ही कराचीमध्ये सरीयल (सनकी) म्हणतो. मला आनंदी आणि सकारात्मक लोक आवडतात. तुम्ही रागीट आणि स्पर्धात्मक वर्तवणूक करत असाल तरी हरकत नाही मात्र तुम्ही सकारात्मक असावे. गंभीर तसा नव्हता,’ असं आफ्रिदीने पुरस्तकामध्ये लिहिले आहे.

गंभीर आफ्रिदी वाद

२००७ साली गंभीर आणि आफ्रिदीमध्ये कानपूर येथील भारत पाकिस्तान एकदिवसीय सामन्यादरम्यान वाद झाला. खेळांच्या नियमांचा भंग करुन मैदानात वाद घातल्याबद्दल आयसीसीने दोघांनाही दंड ठोठावला. या घटनेबद्दल बोलताना ‘२००७ साली आशिया कप स्पर्धेतील एका समान्यादरम्यान धाव घेताना गंभीर थेट माझ्या अंगावर आला होता. त्यानंतर तो वाद झाला त्यानंतर पंचांना मध्यस्थी करावी लागली. यावेळी आम्ही एकमेकांसाठी अपशब्द वापरले होते,’ असं आफ्रिदी म्हणाला होता.

भारतीय संघासाठी मानसिक तज्ज्ञ म्हणून काम करणारे प्रशिक्षक पॅडी अॅप्टन यांनी लिहीलेल्या एका पुस्तकामध्ये गंभीरला सतत असुरक्षित वाटत असे असं म्हटलं आहे. ‘असे असले तरी या असुरक्षिततेचा परिणाम गंभीरच्या खेळावर झाला नाही आणि तो भारतासाठी क्रिकेट खेळणाऱ्या सर्वोत्तम सलामीवीरांपैकी एक ठरला,’ असेही पॅडी यांनी म्हटले आहे. ‘गंभीरने दीडशे धावा केल्यानंतर मला २०० धावा करता आल्या नाहीत म्हणून तो उदास असायचा. मी आणि तत्कालीन प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी त्याला किती समजून सांगितले तरी फरक पडायचा नाही,’ असंही पॅडी आपल्या पुस्तकात म्हणाले आहेत. पॅडी यांच्या या पुस्तकाबद्दल बोलताना गंभीरने ‘त्यांनी केलेली वक्तव्ये सकारात्मकच आहेत. पॅडी चांगली व्यक्ती असल्याने त्यांच्या मताचा मी सन्मान करतो. तसेच त्यांच्यामुळेच माझ्यामधील असुरक्षिततेची दखल घेतली गेली याचं समाधान आहे,’ असं म्हटलं होतं.