मानहानीकारक पराभवानंतर भारतीय संघावर माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी खरमरीत टीका केली आहे. लॉर्ड्सवरील ऐतिहासिक विजयानंतर त्यानंतरच्या पाच दिवसांमध्ये भारतीय संघाने काय केले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
‘‘इंग्लंडचे मनोबल उंचावण्यात भारतीयांनी मदत केली आहे. लॉर्ड्ससारख्या इंग्लंडच्या बालेकिल्ल्यावर विजय मिळवत त्यांच्या मनोबलाचे खच्चीकरण केले होते. पण त्या विजयानंतरच्या पाच दिवसांमध्ये भारतीयांनी नेमके काय केले. पहिल्या दिवशी भारतीय खेळाडू आळसावलेले वाटले. आपण स्लिप आणि अन्य बऱ्याच गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. अजिंक्य रहाणेचा अपवाद वगळता एकाही खेळाडूने प्रतिकार केला नाही. जेम्स अँडरसनने चांगली गोलंदाजी केली यात वाद नाही, पण आपण त्याचा प्रतिकार करू शकलो नाही, याचेच वाईट वाटते,’’ असे गावस्कर यांनी सांगितले.