गतवर्षी जुलैमध्ये झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यातील भारताच्या पराभवापासून प्रदीर्घ विश्रांतीवर असलेल्या महेंद्रसिंह धोनीविषयी माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी शनिवारी सवाल उपस्थित केला. भारताकडून खेळण्यावाचून कोणताही क्रिकेटपटू स्वत:ला इतका काळ दूर राखू शकतो का, असा प्रश्न गावस्कर यांनी केला.

गेल्या वर्षी ९ जुलैला न्यूझीलंडकडून पराभवामुळे भारताचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले. तेव्हापासून भारताचे प्रतिनिधित्व न करणाऱ्या ३८ वर्षीय धोनीच्या भवितव्याबाबत विविध चर्चा आणि अफवांना उधाण आले आहे. येत्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) पुनरागमन करणार असल्याचे धोनीने स्पष्ट केले आहे.

धोनी भारताच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक संघात पुनरागमन करील का, या प्रश्नाला उत्तर देताना गावस्कर म्हणाला की, ‘‘तंदुरुस्ती ही अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर तोच देईल. परंतु विश्वचषकापासून तो अनुपलब्धच आहे. परंतु इतका काळ कोणताही खेळाडू स्वत:ला भारतीय संघापासून दूर ठेवू शकतो का, हाच प्रश्न आहे आणि त्यातच उत्तर दडले असावे.’’