भारतामधील हॉकी संपली अशी टीका होत असतानाच सरदारासिंग याच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष गटात सोनेरी कामगिरी केली. विजयादशमीच्या पूर्वसंध्येला भारतीय संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला पराभूत केले एवढेच नव्हे तर रिओ ऑलिम्पिकमधील प्रवेशही निश्चित केला.
जागतिक स्पर्धा, अझलान शाह चषक, चॅम्पियन्स चषक आदी स्पर्धामध्ये सतत अपयशास सामोरे जावे लागल्यामुळे भारतीय हॉकी संघ नेहमीच टीकेचे लक्ष्य बनला होता. हॉकी हा जरी आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ मानला जात असला तरी या खेळातील अपयश, संघटनात्मक स्तरावरील टोकाला गेलेले मतभेद, खेळाच्या प्रसाराबाबत दिसून येणारी उदासीनता यामुळे भारतामधील हॉकी संपली की काय अशीच प्रतिक्रिया नेहमी ऐकायला मिळते.
या पाश्र्वभूमीवर भारतीय संघाने कोरियातील आशियाई स्पर्धेत मिळविलेले सुवर्ण खरोखरीच देशातील प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटावे असेच आहे. या स्पर्धेतील सुवर्णपदकासाठी भारतास १६ वर्षे वाट पाहावी लागली. यापूर्वी १९९८ मध्ये धनराज पिल्ले याच्या नेतृत्वाखाली भारताने बँकॉक येथे सोनेरी कामगिरी केली होती.
पाकिस्तानविरुद्ध कोणताही सामना असो, सामना सुरू होण्यापूर्वीच भारतीय खेळाडूंचे मानसिक धैर्य निम्मे झालेले असते, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. या स्पर्धेतील साखळी लढतीत गतविजेत्या पाकिस्तानने भारतास हरविले होते. त्यामुळेच अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघ कसा खेळतो हीच उत्सुकता होती. ‘चक दे इंडिया’ या चित्रपटाप्रमाणेच भारतीय संघाने अंतिम लढतीत उत्कृष्ट सांघिक समन्वय व भक्कम बचाव दाखविला. कर्णधार सरदारासिंग याचे कुशल नेतृत्व व गोलरक्षक पी. आर. श्रीजेश याची पोलादी भिंत यामुळेच भारताने अशक्य गोष्ट शक्य करून दाखविली. अर्थात, संघातील प्रत्येक खेळाडूला आणि संघाचे मुख्य प्रशिक्षक टेरी वॉल्श यांचे मार्गदर्शन याचाही या सुवर्णपदकात महत्त्वाचा वाटा आहे. प्रत्येक खेळाडूवर जी जबाबदारी सोपविण्यात आली होती, ती जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. विजेतेपद मिळविण्यासाठी आवश्यक असणारी देहबोलीही या खेळाडूंच्या नसानसात भरली होती. शेवटपर्यंत पाकिस्तानी खेळाडूंचे कोणतेही दडपण न घेता त्यांनी जिद्दीने खेळ केला. पेनल्टी स्ट्रोकच्या वेळी श्रीजेश याने दाखविलेला संयम व चातुर्य याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
भारताच्या या विजेतेपदामुळे हॉकी क्षेत्रात आलेली मरगळ दूर होण्यासाठी मदत मिळणार आहे. ‘होय, आम्ही मेजर ध्यानचंद यांचे वारसदार आहोत,’ असे अभिमानाने सांगण्याची संधी प्रत्येक हॉकीपटूला मिळणार आहे. क्रिकेट हा खेळ रक्तात भिनलेल्या भारतीयांना आता आमचा देश हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांची कर्मभूमी आहे, असे हक्काने सांगता येणार आहे.
हे सुवर्णपदक भारतासाठी भावी सुवर्णअध्यायाची नांदीच असणार आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये आता थेट प्रवेश मिळाल्यामुळे भारताला या स्पर्धेसाठी पूर्वतयारी करण्यासाठी भरपूर अवधी मिळणार आहे. आशियाई विजेतेपदापेक्षाही ऑलिम्पिकचे सुवर्णपदक हे खूप मोठे आव्हान असणार आहे. तेथे नेदरलँड्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया यांच्यासारख्या रथी-महारथी संघांशी खेळावे लागणार आहे. आशियाई सुवर्णपदकाने हुरळून न जाता ऑलिम्पिकमध्ये अव्वल स्थान मिळविण्यासाठी कोणती रणनीती वापरावी लागेल, ब्राझीलमधील वातावरण, संभाव्य प्रतिस्पर्धी यांचा बारकाईने अभ्यास करीत भक्कम संघबांधणी करण्यासाठी भारतीय संघटकांनी विचार केला पाहिजे. आशियाई विजेतेपद म्हणजे ऑलिम्पिकच्या विजेतेपदाची रंगीत तालीम आहे हा विचार आपल्या मनावर बिंबवून त्याप्रमाणे आचरण करण्याची जबाबदारी भारतीय हॉकीपटूंवर व संघटकांवर आहे.