सोल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन

आशियाई मॅरेथॉन स्पर्धेचा विजेता गोपी थोनाकल याने सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात दोहा येथे रंगणाऱ्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र होण्याचा मान पटकावला आहे. रविवारी झालेल्या सोल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये गोपीने ११वा क्रमांक प्राप्त केला.

भारताचा अव्वल धावपटू गोपी याने २ तास १३ मिनिटे ३९ सेकंद अशी आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना जागतिक स्पर्धेचे तिकीट मिळवले आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र होण्यासाठी २ तास १६ मिनिटे हा निकष ठेवण्यात आला होता.

सोल मॅरेथॉन ही आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन महासंघाची (आयएएएफ) सुवर्ण दर्जा लाभलेली मॅरेथॉन आहे. गोपीने २०१७ मध्ये चीन येथील डोनगुआन येथे झालेल्या आशियाई मॅरेथॉन शर्यतीचे जेतेपद पटकावले होते. त्याचबरोबर २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये त्याने २५वा क्रमांक प्राप्त केला होता.

त्यानंतर लंडन येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत गोपीने २८व्या क्रमांकावर झेप घेतली होती. आता जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरणारा गोपी हा भारताचा दुसरा धावपटू ठरला आहे. चार दशकांपूर्वी शिवनाथ सिंग यांनी २ तास १२ मिनिटे ही वेळ नोंदवून राष्ट्रीय विक्रमासह जागतिक स्पर्धेत सहभागी होण्याचा मान पटकावला होता.