भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचा एमसीए अध्यक्षपदासाठीचा उमेदवारी अर्ज गुरुवारी सकाळी फेटाळण्यात आला. मुंडे यांचा अर्ज शनिवारी अवैध ठरवल्यानंतर त्यांनी त्याविरोधात दाद मागितली होती. परंतु शुक्रवारी होणाऱ्या एमसीएच्या निवडणुकीसाठीचा त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री शरद पवार यांची अध्यक्षपदावर बिनविरोध निवड झाली आहे. परंतु या निर्णयाविरोधात मुंडे न्यायालयात जाणार आहेत. दरम्यान, निवडणूक अधिकारी अ‍ॅड. एस. एम. गोरवंडकर यांनी पवार हे अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आल्याचे गुरुवारी रात्री जाहीर केले.
भाजपचे माजी उपमुख्यमंत्री मुंडे यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी कायमस्वरूपी वास्तव्याच्या मुद्यावरून अवैध ठरवला होता. निवडणूक आयोगाच्या बीड मतदार यादीमध्ये मुंडे यांचे नाव आहे, असे कारण दर्शवून शनिवारी मुंडे यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला होता. त्याबाबत मुंडे आणि त्यांचे वकील अ‍ॅड. नितीन प्रधान यांनी दाद मागून आपले युक्तीवाद सादर केले होते. परंतु त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला आहे, अशी माहिती एमसीएचे मावळते अध्यक्ष रवी सावंत यांनी दिली.
मुंबईचे कायमस्वरूपी वास्तव्य याबाबत एमसीएच्या नियमानुसार मुंडे यांचा अर्ज फेटाळण्यात आला. याविषयी सावंत म्हणाले, ‘‘मुंबई उच्च न्यायालयाच्या २००६मधील एका निकालानुसार एखाद्या व्यक्तीचे विविध शहरांमध्ये वास्तव्य असू शकते. परंतु त्याचे नाव ज्या मतदारसंघाच्या निवडणूक यादीत असेल ते ठिकाण त्या व्यक्तीचे कायमस्वरूपी वास्तव्य ग्राह्य मानावे.’’
‘‘मुंडे यांनी दाद मागताना आपले मुंबईचे कायमस्वरूपी वास्तव्य आहे, हे दाखवणारे अनेक पुरावे सादर केले. या पुराव्यातून ते मुंबईला वास्तव्यास होते हे स्पष्ट होते. परंतु नियमानुसार त्यांचे कायमस्वरूपी वास्तव्य असणे आवश्यक आहे. आम्हाला मुंडे यांच्याकडून जे पुरावे सादर करण्यात आले त्यातून ते मुंबईचे कायमस्वरूपी निवासी आहेत, हे सिद्ध होत नव्हते,’’ असे सावंत म्हणाले.
मुंडे यांचा अर्ज अध्यक्षपदाच्या शर्यतीमधून बाद झाल्यामुळे फक्त केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची अध्यक्षपदावर बिनविरोध निवड झाल्याचे स्पष्ट होत आहे, याबाबत सावंत म्हणाले की, ‘‘निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी फक्त दोन उमेदवारी अर्ज अध्यक्षपदासाठी होते. आता अध्यक्षपदासाठी फक्त पवार हे एकमेव उमेदवार असल्यामुळे तुम्ही बिनविरोधपणे असे म्हणून शकतो.’’
पवारांचे कायमस्वरूपी वास्तव्य बारामती असल्याबाबत मुंडे यांनी बुधवारी म्हटले होते. याबाबत स्पष्टीकरण देताना सावंत म्हणाले की, ‘‘६ जून २०१३ला एमसीएला एक पत्र देण्यात आले असून, त्यात पवार यांनी आपले कायमस्वरूपी वास्तव्य मुंबईला हलवण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यांचे नाव मुंबईच्या मतदार यादीत असल्याचा पुरावा त्यांनी सादर केला आहे. त्यामुळे पवार यांनी जेव्हा उमेदवारी अर्ज भरला तेव्हा ते मुंबईचे कायमस्वरूपी निवासी आहेत हे स्पष्ट होते.’’