कान : ग्रँडमास्टर अभिजित गुप्ता याने नवव्या आणि अखेरच्या फेरीत इटलीच्या लुईगी बास्सो याच्याविरुद्धचा डाव सहजपणे बरोबरीत सोडवत कान आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

अभिजितने ७.५ गुण पटकावून बेलारूसचा निकिता मायोरोव्ह, पोलंडचा नासूता ग्रेगोर्झ आणि युक्रेनचा युरी सोलोडोनिचेको या अव्वल प्रतिस्पध्र्याना मागे टाकून विजेतेपदाला गवसणी घातली. अभिजितने पहिले चार डाव जिंकून या स्पर्धेत धडाक्यात सुरुवात केली होती. त्यानंतर तीन बरोबरी आणि दोन विजय मिळवत अभिजितने विजेतेपदावर नाव कोरले. या विजेतेपदामुळे रेटिंग गुणांची कमाई करत अभिजितने २६०० रेटिंग गुण असलेल्या खेळाडूंच्या पंक्तीत स्थान मिळवले.

या वर्षी अभिजितने दिल्ली आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जेतेपद पटकावले होते. तो म्हणाला, ‘‘स्पर्धेच्या नऊ दिवसआधी माझा विवाहसोहळा पार पडल्याने लग्नाच्या धामधूमीत मी व्यग्र होतो. त्यामुळे मला या स्पर्धेची तयारी करता आली नाही. मात्र सुरुवातच चांगली झाल्याने माझ्यासाठी पुढील गोष्टी सोप्या होत गेल्या.’’