‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंग धोनी याचा आज वाढदिवस. धोनीने आज ४०व्या वर्षात म्हणजेच Fabulous 40मध्ये पदार्पण केले. २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत धोनीने भारताकडून उपांत्य सामना खेळला. त्या पराभवानंतर धोनी क्रिकेटपासून दूर आहे. तो सध्या आपल्या कुटुंबासोबत रांचीच्या फार्महाऊसमध्ये वेळ घालवतो आहे. देशात लॉकडाउन सुरू झाल्यापासून धोनी आपली पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा हिच्यासोबत आहे. याचसोबत धोनी आपला बराचसा वेळ PUBG खेळण्यातही घालवतो. खुद्द साक्षीने याबद्दल सांगितलं होते.

धोनी कर्णधार असलेल्या CSK संघाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून साक्षीशी संवाद साधला होता. महिला अँकर रूपा रमाणी हिने CSK आणि चाहत्यांतर्फे साक्षीला प्रश्न विचारले आणि साक्षीने त्या प्रश्नांची दमदार उत्तरं दिली. याच मुलाखती दरम्यान धोनीला सध्या PUBG खेळाचे वेड लागले असून तो झोपतही याच खेळाबद्दल बडबड करत असतो, असं साक्षीने सांगितलं. “धोनीच्या डोक्यात कायम कसले तरी विचार सुरू असतात. त्याचं डोकं कधीच शांत नसतं. तो जेव्हा व्हिडीओ गेम खेळतो, तेव्हा त्याचं लक्ष थोडं विचार करण्यापासून मुक्त होतं. ती एक गोष्ट चांगली आहे. पण आता त्या PUBG खेळाने माझ्या बेडवर अतिक्रमण केलं आहे. हल्ली माही (धोनी) झोपेतही त्या PUBG गेममबद्दलच बडबड करत असतो”, असं साक्षीने सांगितलं होतं.

महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्ती संदर्भात रोज काही ना काही अफवा उठवल्या जात असतात. महिन्याभरापूर्वीदेखील अचानक #Dhoni Retires असा एक हॅशटॅग ट्रेंड झाला होता. या साऱ्या प्रकारावर धोनीची पत्नी साक्षी हिने टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले होते. “लॉकडाउनमुळे काही लोकांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. म्हणून असला हॅशटॅग ट्रेंड होतोय. अशा लोकांनी आपल्या स्वत:च्या आयुष्यात लक्ष घालावं”, असं ती म्हणाली होती.