न्यूझीलंड दौऱ्यासाठी आज भारतीय संघनिवड; तिसऱ्या सलामीवीराच्या स्थानासाठी राहुल आणि गिल शर्यतीत

न्यूझीलंडच्या संपूर्ण दौऱ्यासाठी रविवारी भारतीय संघनिवड करताना मर्यादित षटकांच्या संघात अष्टपैलू हार्दिक पंडय़ाचे पुनरागमन निश्चित मानले जात आहे. तसेच कसोटी संघातील तिसऱ्या सलामीवीराच्या स्थानासाठी शुभमन गिल किंवा लोकेश राहुल यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याला २४ जानेवारीपासून प्रारंभ होत असून, यात पाच ट्वेन्टी-२०, तीन  एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांचा समावेश आहे. भारतीय संघ मर्यादित षटकांचे एकूण आठ सामने खेळणार असल्यामुळे १५ खेळाडूंऐवजी १६ किंवा १७ खेळाडूंची निवड करू शकेल. भारतीय ‘अ’ संघसुद्धा न्यूझीलंड दौऱ्यावर असल्याने आवश्यकता भासल्यास खेळाडूंचे आणखी पर्याय तिथेच उपलब्ध होऊ शकतील. येत्या वर्षांत होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या दृष्टिकोनातून निवड समिती मर्यादित षटकांचे भारतीय संघ निवडेल.

पाठीच्या दुखापतीतून सावरलेला हार्दिक सध्या भारतीय ‘अ’ संघासह न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. हे प्रथम श्रेणी सामने २६ जानेवारीला संपतील. परंतु हार्दिकच्या तंदुरुस्तीचा आढावा घेऊन त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात येईल. ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठीच्या भारतीय संघाचा तो प्रमुख घटक असेल, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी दिली.

कसोटी संघनिवड करताना रिक्त स्थानांची संख्या नगण्य आहे. तिसऱ्या सलामीवीराच्या जागेसाठी युवा गिलला संधी मिळू शकते. परंतु सध्याचे फलंदाजीतील सातत्य आणि अनुभव हे लोकेश राहुलच्या पथ्यावर पडेल.

* एकदिवसीय क्रिकेट संघात केदार जाधव आपले स्थान टिकवतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. न्यूझीलंड दौऱ्यावर जाधवचे तांत्रिक दोष उघडे पडतील, असा जाणकारांचा अंदाज आहे.

* परदेशी खेळपट्टय़ांचा तांत्रिकदृष्टय़ा विचार केल्यास अजिंक्य रहाणे एकदिवसीय संघात पुनरागमन करू शकेल.

* ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने एकदिवसीय संघनिवड केल्यास मुंबईचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर उत्तम पर्याय ठरू शकेल.

* कसोटी संघासाठी जसप्रीत बुमरा, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा यांच्यावर वेगवान माऱ्याची मदार असेल. पाचव्या गोलंदाजाच्या जागेसाठी नवदीप सैनी उत्तम पर्याय ठरेल.

* रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या साथीला फिरकी गोलंदाजाच्या तिसऱ्या स्थानासाठी कुलदीप यादव उपयुक्त ठरू शकेल.

राहुल सहाव्या स्थानी कायम 

 सलामीवीर लोकेश राहुलला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ट्वेन्टी-२० क्रमवारीत

सहावे स्थान कायम राखण्यात यश आले आहे. कर्णधार विराट कोहलीला १०व्या स्थानावरून नववे स्थान मिळवता आले आहे. एकदिवसीय आणि कसोटी क्रमवारीत कोहलीला अग्रस्थान आहे.  भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची ट्वेन्टी-२० मालिका संपल्यानंतर ‘आयसीसी’ने क्रमवारी जाहीर केली आहे. भारताकडून फलंदाजांमध्ये राहुलला सर्वाधिक स्थान मिळाले आहे. राहुलने श्रीलंकेविरुद्धच्या दोन ट्वेन्टी-२० लढतींत ४५ आणि ५४ धावा फटकावल्या. भारताचा दुसरा सलामीवीर शिखर धवननेही १६व्या स्थानावरून १५वे स्थान मिळवले आहे. ट्वेन्टी-२० संघांच्या क्रमवारीत भारत पाचव्या स्थानी कायम आहे.