पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांचे ठाम मत

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या मलेशियाविरुद्ध झालेल्या उपांत्य सामन्यात पराभव स्वीकारणाऱ्या भारतीय हॉकी संघाला शेवटच्या क्षणी विरोधी संघाला गोल करू देण्याची चूक पुन्हा महागात पडली. मात्र, तरीही भारताला कोणत्याही मानसशास्त्रज्ञ किंवा मनोचिकित्सकाची गरज नसून मीच या संघाचा सर्वकाही आहे, अशी कणखर प्रतिक्रिया संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांनी शुक्रवारी दिली.

नोव्हेंबर महिन्यात ओडिशा येथे होणाऱ्या पुरुषांच्या हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने भारतीय संघाच्या नव्या जर्सीचा अनावरण सोहळा मुंबईत पार पडला. या सोहळ्याला हॉकी संघाचे खेळाडू, प्रशिक्षक, माजी हॉकीपटू अजित पाल सिंग, अशोक कुमार, दिलीप तिरकी, संदीप सिंग व धनराज पिल्ले इत्यादी मंडळी उपस्थित होते.

हरेंद्र म्हणाले, ‘‘उपांत्य फेरीत मलेशियाविरुद्ध आमचा पराभव झाला यापेक्षा आम्ही पाकिस्तानला नमवून किमानं कांस्यपदक मिळवले, हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. त्या पराभवामुळे संघाच्या मानसिकतेवर काम करण्यासाठी एखाद्या विशेषज्ञाची गरज आहे, असे मला वाटत नाही.’’

‘‘मला या शब्दातच नकारात्मकता दिसते. कोणत्याही संघाला प्रेरणा देण्याचे काम फक्त त्या संघाचा प्रशिक्षक व स्वत: खेळाडूच करू शकतो. जर मी स्वत:च स्वत:ला प्रेरणा देऊ शकलो नाही, तर विश्वात कोणीही मला किंवा माझ्या खेळाडूंना प्रेरणा देऊ शकत नाही,’’ असे हरेंद्र म्हणाले.  याव्यतिरिक्त, भारतीय संघ १६ सप्टेंबरपासून हॉकी विश्वचषकाच्या तयारीला लागणार असून आशियाई स्पर्धेत जे काही झाले ते विसरून आम्ही नव्या दमाने विश्वचषकासाठी मेहनत घेणार आहोत, असेही हरेंद्र यांनी नमूद केले.

या संघात विश्वचषक जिंकण्याची क्षमता!

महान हॉकीपटू धनराज पिल्ले यांनी भारतीय हॉकी संघाला विश्वचषकासाठी शुभेच्छा देताना त्यांच्यावर कौतुकाचा वर्षांव केला. ते म्हणाले, ‘‘१९७५ मध्ये भारताने हॉकी विश्वचषक जिंकल्यानंतर तब्बल ४३ वर्षे उलटली, तरी आपण त्या सुवर्णस्वप्नाची वाट पाहत आहोत. मात्र या संघात ते स्वप्न पूर्ण करण्याची नक्कीच क्षमता आहे, असे मला वाटते.’’

‘‘या संघातील प्रत्येक खेळाडूला त्याच्या कर्तव्याची जाण असून चॅम्पियन्स करंडक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत आपल्याला त्याचा अनुभव आला. त्यामुळे, संघातील वरिष्ठ खेळाडूंनी युवा खेळाडूंना साथीला घेत सुरेख खेळ केल्यास यंदाचा विश्वचषक आपलाच असेल, यात मला शंका नाही,’’ असेही धनराज म्हणाले.