गतरणजी विजेत्या मुंबईच्या संघाला यंदा अंकित चव्हाण आणि रमेश पोवारच्या अनुपस्थितीत फिरकीपटूची कमतरता भासण्याची शक्यता होती. परंतु स्पॉट-फिक्सिंग प्रकरणी निर्दोष सुटलेला हरमीत सिंग विदर्भकडून नव्हे, तर मुंबईचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे स्पष्ट झाल्याने मुंबईची फिरकीची चिंता मिटण्याची शक्यता आहे.
भारतीय खेळपट्टय़ांवर फिरकी ही भारतीय क्रिकेटचे शक्तीस्थान मानले जाते. रणजी सामन्यांमध्ये मुंबईचाही असाच दबदबा आहे. गेल्या काही वर्षांपर्यंत अनेक फिरकीपटूंनी मुंबईला रणजी स्पर्धेत एकहाती विजय मिळवून दिले असले तरी सध्याचे चित्र मात्र वेगळे आहे. अनुभवी ऑफ-स्पिनर रमेश पोवार हा राजस्थानकडून खेळणार आहे, तर डावखुरा फिरकी गोलंदाज अंकित चव्हाणवर आयपीएल स्पॉट-फिक्सिंगप्रकरणी आजीवन बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मागील हंगामात मुंबईच्या फिरकीची धुरा वाहणारे दोन्ही महत्त्वाचे गोलंदाज येत्या रणजी हंगामासाठी उपलब्ध नसतील. परंतु हरमीतच्या उपलब्धतेमुळे मुंबईकरिता एक चांगला पर्याय मिळणार आहे.
वर्षभरापूर्वी मुंबईतून खेळण्याची संधी मिळत नसल्यामुळे हरमीतने विदर्भकडून खेळण्याचा निर्णय घेतला होता. पण आयपीएलच्या स्पॉट-फिक्सिंग प्रकरणाची चौकशी सुरू असताना विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (व्हीसीए) वार्षिक सर्वसाधारण सभेत हरमीतचा विचार न करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर स्पॉट-फिक्सिंग प्रकरणाचा निकाल लागला आणि हरमीत निर्दोष ठरला. आता हरमीतने मुंबईकडून पुन्हा एकदा खेळण्याचा निर्णय घेतला असून, त्याला यंदा तरी संधी मिळणार का, याची उत्सुकता साऱ्यांनाच असेल.

हरमीतने वर्षभरापूर्वी विदर्भकडून खेळायचे असल्याचे सांगत आमच्याकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घेतले होते. पण त्यानंतर आयपीएलच्या स्पॉट-फिक्सिंग प्रकरणाच्या निकालानंतर हरमीतने मुंबईकडून खेळायची इच्छा दर्शवली आणि विदर्भ क्रिकेट असोसिएशनकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र आणले. ते आम्ही निवड समिती अध्यक्ष सुधीर नाईक यांना दिले असून, आता निवड समिती गुणवत्ता आणि कामगिरीच्या जोरावर त्याच्याबाबतचा निर्णय घेईल
-पी.व्ही. शेट्टी, एमसीएचे सचिव

कोणत्याही एका खेळाडूबाबत बोलणे योग्य ठरणार नाही. रणजी स्पर्धेला अजून बराच वेळ आहे आणि या कालावधीमध्ये आम्ही बऱ्याच युवा खेळाडूंचा खेळ पाहणार आहोत. त्यामुळे प्रत्येक खेळाडूला गुणवत्ता आणि कामगिरीच्या जोरावरच संघात स्थान देण्यात येईल.
सुलक्षण कुलकर्णी, मुंबईचे प्रशिक्षक