भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीसमोर अडचणी काही केल्या कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. पत्नी हसीन जहानने केलेल्या आरोपांवरुन कोलकाता पोलिसांनी शमीविरोधात हुंडा, शाररिक हिंसा आणि लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल केलं आहे. अलिपूर न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात शमीविरोधात भारतीय दंड संहितेतील ४९८ अ आणि ३५४ अ ही कलमं लावण्यात आलेली आहेत. मात्र या नंतरही बीसीसीआय शमीविरोधात काहीही कारवाई करत नसल्यामुळे, पत्नी हसीन जहानने आश्चर्य व्यक्त केलं आहे.

“या प्रकरणी आरोपपत्र दाखल झाल्यामुळे मला दिलासा मिळाला आहे. यासंबंधी मी बीसीसीआयला पत्र लिहून शमीवर कारवाईची मागणी केली होती, मात्र त्यावर अजुन कारवाई का झाली नाही हेच समजत नाहीये. या प्रकरणात आपली बाजू सत्याची असल्यामुळे न्यायालयात आरोपपत्र दाखल झाल्याचंही हसीनने म्हणालं. आपली बाजू मांडण्यासाठी सर्व पुरावे पोलिसांकडे दिल्याचंही हसीन जहानने स्पष्ट केलं. माझा न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास असून मला योग्य न्याय मिळेलं असंही हसीन म्हणाली.

गेल्या वर्षभरात मोहम्मद शमीने दमदार पुनरागमन करत सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या कसोटी मालिकेत शमीने चांगली गोलंदाजी केली. यानंतर घरच्या मैदानावर झालेल्या मालिकेमध्येही शमीची कामगिरी आश्वासक होती. याच कामगिरीच्या जोरावर आगामी विश्वचषकात त्याचं स्थान निश्चीत मानलं जात आहे. मात्र कोलकाता पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर, त्याच्या संघातील सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. २२ जून रोजी या प्रकरणातील पुढील सुनावणी ठेवण्यात आलेली आहे. दरम्यान या प्रकरणी बीसीसीआयने अद्याप कोणत्याही प्रकारे अधिकृत भूमिका जाहीर केली नसल्यामुळे, पुढे नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.