२०२० वर्षात भारतीय संघ ५ जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. २०१९ वर्ष हे वर्ष भारतीय संघासाठी काही ठराविक अपवाद वगळता चांगलं गेलं. भारतीय गोलंदाजांनी या वर्षात उल्लेखनीय कामगिरी केली, मात्र काही गोलंदाजांना दुखापतीचाही सामना करावा लागला. टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज दीपक चहर यातलंच एक नाव…

जाणून घ्या कधी झाली होती दुखापत??

वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्यात कटक वन-डे सामन्यादरम्यान दीपकच्या पाठीची दुखापत बळावली. ज्यामुळे डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला. त्याच्या जागेवर नवदीप सैनीची भारतीय संघात निवड करण्यात आली. सध्या दीपकला एक वेगळीच चिंता सतावते आहे.

कसली चिंता सतावतेय दीपक चहरला??

“सध्या मला जे पाठीचं दुखणं सतावत आहे ते माझ्या क्रिकेटच्या अतिरेकामुळे होतंय. गेले काही महिने मी सतत खेळतोय. त्यामुळे आगामी काळात मी मोजक्याच सामन्यांमध्ये खेळण्याचं ठरवलंय, नाहीतर माझं काही खरं नाही. सतत चांगली कामगिरी करत राहणं हे माझं ध्येय आहे. गेले काही महिने मी सतत खेळत असल्यामुळे माझी गती थोडीशी कमी झाल्याचं मला लक्षात आलंय. त्यामुळे या सर्व गोष्टींची घडी बसवण्यासाठी मला काही कालावधी लागेल”, दीपक टेलिग्राफ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

काय घडणार भविष्यात??

पाठीच्या दुखापतीमुळे दीपक श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यात खेळू शकणार नाहीये. न्यूझीलंड दौऱ्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ वन-डे मालिकेसाठी भारतात दाखल होणार आहे, त्यानंतर सर्व खेळाडू आयपीएलसाठी आपापल्या संघाकडून खेळण्यात मग्न होतील. त्यामुळे दरम्यानच्या काळात दीपक आपल्या दुखापतीवर मात करत संघात पुनरागमन करतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.