पाकिस्तानचा माजी दिग्गज गोलंदाज शोएब अख्तरने भारताचा युवा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीचं तोंडभरुन कौतुक केलंय. इंग्लंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात आणि आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच कृष्णाने 8.1 षटकात 54 धावा देऊन 4 विकेट घेतल्या. त्याच्या या दमदार कामगिरीवर अख्तरने स्तुतीसुमनं वाहिली आहेत.

“तो कृष्णा नाही करिष्मा (चमत्कार) आहे…इंग्लंडच्या सलामीवीरांनी गोलंदाजीची पिसं काढल्यानंतरही त्याने ज्याप्रकारे पुनरागमन केलं ते चमत्कारापेक्षा कमी नव्हतं”, असं अख्तर आपल्या युट्यूब चॅनलवरील व्हिडिओमध्ये म्हणाला. यासोबतच, चेंडू टाकताना स्पीड कधीही कमी होऊ देऊ नकोस असा सल्लाही अख्तरने कृष्णाला दिला.

“फलंदाजांनी आक्रमण केल्यानंतर दमदार पुनरागमन करण्यासाठी एक वेगवान गोलंदाज म्हणून तुम्ही तुमची हिंमत, कौशल्य आणि अ‍ॅटिट्यूड दाखवणं गरजेचं असतं.. ज्याप्रकारे त्याने चार बळी घेतले ती खूपच चांगली कामगिरी होती…अशीच कामगिरी करत राहा… फक्त एक गोष्ट लक्षात ठेव की, जेव्हा केव्हा तुझ्या गोलंदाजीवर फलंदाज आक्रमण करतील तेव्हा गोलंदाजी करताना चेंडूचा स्पीड कमी होऊ देऊ नकोस. तुझं लक्ष फक्त यष्ट्यांवर ठेव आणि त्याच उडवण्याचं मनात ठरव…जेव्हा काय करावं हे कळत नसेल तेव्हा तुला फक्त हेच करायचंय! असं अख्तर म्हणाला. पुढे बोलताना, “गोलंदाजीचा स्पीड सतत वाढवत रहा, कधीच वेग कमी होऊ देऊ नकोस” असा सल्ला शोएबने कृष्णासाठी दिला.


25 वर्षीय कृष्णाने मंगळवारी इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सुरुवातीच्या काही षटकांमध्ये महागडा ठरलेल्या कृष्णाने सामन्याच्या उत्तरार्धात चमकदार कामगिरी करत इंग्लंडच्या चार फलंदाजांना तंबुचा मार्ग दाखवला. या कामगिरीसह कृष्णाने 24 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडित काढला. त्याने माजी क्रिकेटर नोएल डेव्हिड यांचा 24 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला .1997 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण करताना डेव्हिड यांनी 21 धावा देऊन 3 बळी घेतले होते. तर,  मंगळवारी झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात कृष्णाने 8.1 षटकात 54 धावा देत 4 बळी टिपले.