04 July 2020

News Flash

बिघडले शरीरसौष्ठवाचे स्वास्थ्य

भारतामध्ये या खेळाचे स्वास्थ्यच बिघडले आहे.

शरीरसौष्ठव

शरीरसौष्ठवाला सर्व खेळांची जननी समजली जाते. निव्र्यसनी आणि सुदृढ शरीर प्रत्येकाचे व्हावे, यासाठी हा खेळ प्रयत्नशील असतो. पण भारतामध्ये या खेळाचे स्वास्थ्यच बिघडले आहे. दोन संघटनांमधील कोर्ट-कचेऱ्यांचे शीतयुद्ध खेळाला मारक ठरते आहे. इराण, थायलंडसारखे देश जागतिक स्पर्धेत जेतेपदे पटकावतात, पण भारताकडे विपुल गुणवत्ता असूनही ही मजल मारता आलेली नाही, हीच गोष्ट नुकत्याच बँकॉकमध्ये झालेल्या जागतिक शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पध्रेत सिद्ध झाली. जर राष्ट्रीय स्तरावरील कार्यरत असलेल्या दोन्ही संघटना एकत्र आल्या आणि त्यांचे शरीरसौष्ठवपटू एकत्रितपणे स्पर्धेत उतरले, तर भारतासाठी तो सुवर्णदिन दूर नाही.
मुंबई आणि महाराष्ट्र आतापर्यंत शरीरसौष्ठवचा खेळ आणि संघटक यांमध्ये नेहमीच वरचढ राहिलेला आहे. एके काळी मुंबईत चार संघटना कार्यरत होत्या, त्या आता तीनवर आल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच दोन संघटनांचे विलिनीकरण झाले, तर सुरेश कदम यांची संघटना मुंबईत स्पर्धाच भरवत नाही. सध्या राष्ट्रीय स्तरावर दोन प्रबळ संघटना कार्यरत आहेत, तर एक संघटना फक्त नावापुरती कार्यरत आहे. तीन वर्षांपूर्वी केंद्रीय क्रीडा खात्याने साऱ्या संघटनांना एकत्रित येण्याचे आवाहन केले होते. त्या वेळी चार पैकी तीन संघटना एकत्र आल्या होत्या, पण संजय मोरे यांच्या संघटनेने आपली चूल स्वतंत्र मांडण्याचेच ठरवले. या तीनपैकी कदम यांची संघटना नंतर मागल्या पावली परतली. पण चेतन पाठारे आणि बाबा मढोक यांच्या दोन संघटना एकत्र येण्यावर ठाम राहिल्या. या दोन संघटनांनी एकत्रित येऊन भारतीय शरीरसौष्ठवपटू महासंघाची स्थापना केली आणि त्यांना क्रीडा मंत्रालयानेही मान्यता दिली. पण ही मान्यता मिळाल्यानंतर सुरू झाला तो शह-काटशहाचा प्रयोग. सध्या दोन्ही संघटना एकमेकांवर वाद-प्रतिवाद करण्यात आपला वेळ आणि पैसा खर्च करत आहे. या साऱ्यापासून तिसरी संघटना दूर आहे. त्यांना या साऱ्याशी, खेळाशी किंवा खेळाडूंशी काही घेणे-देणे नाही. काही शरीरसौष्ठवपटूंना एकत्र करायचे. त्यांना परदेशातील स्पर्धेत सहभागी होण्याचे आमिष दाखवायचे. तिथे पदकांची निश्चिती करून काही जणांना जेतेपद मिळवून द्यायचे आणि अमाप पैसा उकळायचा. खेळाच्या भल्यासाठी कोणतेही पाऊल टाकण्यात त्यांना स्वारस्य वाटत नाही. शरीरसौष्ठव हा खेळ ऑलिम्पिकपर्यंत आपण कसा पोहोचवू शकतो, याचा विचारही त्यांना शिवत नाही.
हे सारे होणारे वाद-विवाद दूर करण्यासाठी अन्य व्यवस्थाही प्रयत्न करताना दिसत नाही. राष्ट्रीय पातळीवरील दोन्ही कार्यरत संघटनांचा केंद्रबिंदू महाराष्ट्र आहे. मोरे औरंगाबादचे, तर पाठारे मुंबईतले, पण महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन या समस्येच्या निवारणासाठी काही करताना दिसत नाही. पाठारे आणि मोरे या महाराष्ट्रातील संघटकांना एकत्रित बोलवून यावर तोडगा काढण्याची नितांत आवश्यकता आहे. खेळाचा विकास आणि प्रसाराची भाषा करणाऱ्या या दोन्ही संघटना ढिम्म आहेत. परंतु केंद्रीय आणि राज्यातील क्रीडा मंत्रालयेसुद्धायाकडे गांभीर्याने पाहात नाही.
खेळ किंवा खेळाडू कुणाची जहागिरी नसते. ते मेहनतीच्या जोरावर पुढे येत असतात. पण या दोन संघटनांमधल्या वादामुळे त्यांची कोंडी पाहायला मिळते. नेमका कोणता झेंडा हाती घ्यायचा, या संभ्रमात त्यांची कारकीर्द फुलत नाही. एका संघटनेतून दुसरीकडे आणि दुसरीतून पहिलीकडे असा उडय़ांचा खेळ त्यांना खेळावा लागतो, यासाठी जबाबदार कोण? आपल्यामधला अहं सोडून खेळ आणि खेळाडूंसाठी हे संघटक काही करू शकत नसतील, तर संघटना काय फक्त मिरवायला हव्यात का, हा प्रश्न आहे. या दोन्ही मोठय़ा संघटना एकत्र आल्या तर शरीरसौष्ठवपटूंना सरकारी नोकरी, बढती आणि इनाम मिळू शकते किंवा ज्यांना खासगी नोकऱ्या आहेत त्यांचा विकास होऊ शकेल. एकत्रित आल्यावर कोर्ट-कचेरीवरील वाचलेला खर्च शरीरसौष्ठवपटूंवर करता येईल. संघटना अधिक सक्षम करता येईल, हे या धुरिणांना समजत नाही का? कोणतेही दडपण न बाळगता शरीरसौष्ठवपटू मैदानात उतरतील आणि भारताचे जेतेपदाचे स्वप्न सत्यात उतरवू शकतील. पण त्यासाठी या दोन्ही संघटनांचे मनोमीलन व्हायला हवे. खेळ आणि खेळाडूंच्या प्रगतीसाठी फक्त प्रामाणिक इच्छा मनात असायला हवी.
स्वत:ला शरीरसौष्ठवपटूंचे पालक म्हणत स्पर्धेच्या नावाखाली परदेशात हे संघटक हिंडून येतात, पण त्यामध्ये शरीरसौष्ठवपटूंच्या भल्याचा विचार असतो का? याचे आत्मचिंतन होणे गरजेचे आहे. यापूर्वी या दोन संघटनांना एकत्र आणण्याचे काही प्रयत्न काही व्यक्तींनी केले, पण त्यांना यश आले नाही. गेल्या चार-पाच वर्षांमध्ये भारताला जागतिक स्पर्धेत चांगला मान-सन्मान मिळायला लागला आहे. भारतीय शरीरसौष्ठवपटू मोठय़ा संख्येने पदकेही मिळवताना दिसत आहेत. त्यामुळे जगावर अधिराज्य गाजवण्याची, तिरंगा फडकवण्याची हीच योग्य वेळ आहे. आता एकजुटीची ताकद दिसली नाही तर शरीसौष्ठव हा खेळ आपले ‘सौष्ठव’ कायमचे हरवून बसू शकतो.
prasad.lad@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2015 3:03 am

Web Title: health failed bodybuilding
Next Stories
1 बेल्जियमचा अडथळा ओलांडण्यात भारत अपयशी
2 विश्वविजेत्यांचा सत्कार बीसीसीआयकडून रद्द
3 श्रीकांत अंतिम फेरीत
Just Now!
X