करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा भारतीय क्रीडा क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. बीसीसीआयसह सर्व महत्वाच्या क्रीडा संघटनांनी आपापल्या महत्वाच्या स्पर्धा काही काळासाठी रद्द केल्या आहेत. सध्याच्या खडतर काळात बंगाल क्रिकेट असोसिएशनने आपल्या खेळाडू व कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचं पाऊल उचललं आहे. सध्याच्या घडीला बंगाल क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळाडू, पंच, कर्मचारी आणि अधिकारी मिळून सुमारेन ३२०० लोकं कार्यरत आहेत. या सर्वांना करोनाविरोधात लढण्यासाठी आरोग्य विम्याचं संरक्षण देण्यात आलेलं आहे.

बंगाल क्रिकेट असोसिएशनतर्फे आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा काढला जातो. यामध्ये करोनासाठी लागणाऱ्या सर्व उपचारांचा खर्च समावेश करण्यात आल्याचं, संघटनेचे अध्यक्ष अविषेक दालमिया यांनी सांगितलं. याचसोबत बंगाल क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असलेल्या माजी कर्मचारी व खेळाडूंनाही हा लाभ मिळणार असल्याचं दालमिया यांनी स्पष्ट केलं. दरम्यान करोनामुळे बंगाल क्रिकेट असोसिएशननेही आपलं कामकाज बंद करुन सर्व अधिकाऱ्यांना घरातून काम करण्याची मूभा दिली आहे.

अवश्य वाचा – CoronaVirus : परिस्थिती नियंत्रणात न आल्यास बीसीसीआय IPL रद्द करण्याच्या तयारीत??