केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने २०२४ च्या ऑलिम्पिकपर्यंत कार्यकाळ वाढवला असला तरी व्होल्कर हेरमॅन यांनी भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघाच्या उच्च कामगिरी संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. हेरमॅन यांनी काही आठवडय़ांपूर्वीच राजीनामा दिलेला असून, याबाबत कोणतेही विशिष्ट कारण दिलेले नाही, असे भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या सूत्रांनी सांगितले.

जर्मनी हेरमॅन यांनी जून २०१९पासून पदाची धुरा सांभाळली. २०२१पर्यंत लांबलेल्या टोक्या ऑलिम्पिकपर्यंत त्यांचा कार्यकाळ होता. परंतु क्रीडा मंत्रालयाने सप्टेंबर महिन्यात तो वाढवून २०२४ च्या ऑलिम्पिकपर्यंत त्यांच्याकडे सूत्रे दिली. पण हेरमॅन यांनी नव्या करारावर स्वाक्षरी केली नव्हती.

‘‘भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघासह गेल्या दीड वर्षांचा कार्यकाळ आनंदात गेला. परंतु आता हे पद सांभाळताना स्वत:च्या अपेक्षांची पूर्तता करणे कठीण जात आहे. त्यामुळे तीन आठवडय़ांपूर्वी मी पदाचा राजीनामा दिला,’’ असे हेरमॅन यांनी सांगितले.

‘‘भविष्यात भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघाचे सल्लागार म्हणून काम करण्यासाठी उत्सुक आहे, असे मत हेरमॅन यांनी माझ्याकडे व्यक्त केले आहे. आम्ही त्याचा गांभीर्याने विचार करू,’’ असे भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी सांगितले.