अंतिम फेरीत चीनवर पेनल्टी शुटआऊमध्ये ५-४ अशी मात करुन तब्बल १३ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर भारतीय महिला हॉकी संघाने आशिया चषकाचं विजेतेपद पटकावलं. या विजयानंतर संपूर्ण देशभरातून महिला हॉकी संघावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतो आहे. आपल्या संघाने केलेल्या कामगिरीची दखल घेत हॉकी इंडियाने १८ सदस्यीय महिला हॉकी संघ आणि मुख्य प्रशिक्षक हरेंद्रसिंह यांना एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही ट्विटरवरुन भारतीय महिला हॉकी संघाच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे.

दुसरीकडे भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी हाती आलेल्या प्रशिक्षक हरेंद्रसिंह यांनी संघाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलं आहे. आशिया चषकाचं विजेतेपद ही महिला संघासाठी एक चांगली सुरुवात आहे. या विजयाचा आगामी स्पर्धांमध्ये आम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल. २०१८ साली आम्हाला राष्ट्रकुल, आशियाई खेळ आणि विश्वचषक अशा महत्वाच्या स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचं आहे. या तीन स्पर्धांमधून भारतीय महिलांच्या संघाने किमान २ पदकं मिळवावी, अशी माझी किमान अपेक्षा असल्याचं हरेंद्रसिंह यांनी ‘पीटीआय’शी बोलताना सांगितलं.

हरेंद्रसिंह यांना याआधी महिला हॉकी संघाला प्रशिक्षण देण्याचा जरासाही अनुभव नाहीये. मात्र, गेली अनेक वर्ष प्रशिक्षणाचं काम पाहणाऱ्या हरेंद्रसिंह यांना आपण भारतीय महिला हॉकीला चांगले दिवस दाखवू, असा आत्मविश्वास वाटतो. यापूर्वी हरेंद्रसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या युवा हॉकी संघाने विश्वचषकाचं विजेतेपद मिळवलं होतं.