विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्यात पराभवाचा सामना करावा लागला. वन-डे मालिकेपाठोपाठ कसोटी मालिकेतही भारताने व्हाईटवॉश स्विकारला. कर्णधार विराट कोहलीचं अपयश हे भारतीय संघाच्या पराभवामागचं प्रमुख कारण मानलं जातंय. दोन कसोटी सामन्यातील चारही डावांत त्याने २० पेक्षा जास्त धावसंख्या ओलांडली नाही. विराट कोहलीच्या खेळावर चहुबाजूनी टीका होत असताना माजी पाक कर्णधार इंझमाम उल-हकने विराटची पाठराखण केलेली आहे.

“सध्या बरीच लोकं विराट कोहलीच्या तंत्राबद्दल बोलत आहेत. या चर्चा ऐकल्या की मला खरंच आश्चर्य वाटतं. त्याने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७० शतकं झळकावली आहेत. त्याच्या खेळावर आणि तंत्रावर शंका कशी घेतली जाऊ शकते?? एक क्रिकेटपटू म्हणून मी इतकच सांगेन की अनेकदा खेळाडूच्या आयुष्यात असे प्रसंग येतात की ज्यावेळी प्रयत्न करुनही धावा होत नाहीत. मात्र हा खेळाचाच एक भाग आहे.” आपल्या यू-ट्युब चॅनलवर बोलत असताना इंझमामने मत मांडलं.

अवश्य वाचा – कसोटी पराभवानंतर विराटला आली जाग, संघात महत्वपूर्ण बदल करण्याचे संकेत

न्यूझीलंडविरुद्ध मालिकेनंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळतील. यानंतर सर्व खेळाडू २९ मार्चपासून आयपीएलच्या तेराव्या हंगामात आपापल्या संघांकडून खेळतील.

अवश्य वाचा – वय वाढलं की खेळावर परिणाम होतो, विराटच्या खराब कामगिरीवर माजी कर्णधाराचं मत