|| डॉ. प्रकाश परांजपे

‘‘आबा, उपास करण्याचे फायदे यावरचे चार लेख मी सकाळी आजीला छापून दिले,’’ असं कार्तिकी एकादशीनिमित्त केलेल्या साबुदाणा खिचडीवर ताव मारत छोटू म्हणाला. ‘‘उपास हे प्रकृतीच्या दृष्टीने एकदम उत्तम, असं आता प्रयोगानं सिद्ध झालंय असंच ‘बीबीसी’पासून सगळे म्हणताहेत.’’

एवढय़ात मेनन बंधू आणि भातखंडे खेळायला हजर झाले. डाव वाटून ख्रिस मेनननं १ चौकट बोली दिली. त्याच्या पद्धतीप्रमाणे त्याचा अर्थ १२ वर चित्रगुण आणि लांब चौकट पंथ असा होता. भातखंडेकडे ७ पानी घट्ट किलवर पंथ आणि इस्पिक एक्का असे नगद ८ दस्त होते. आबांकडे चौकट पंथात थोडी अडगळ आणि १-२ चित्रं असती तर ३ बिहूचा शतकी ठेका जमण्यासारखा होता, पण हे ब्रिजच्या बोलींमधून कसं सुचवायचं हा प्रश्न होता. सुदैवाने भातखंडेने काही ब्रिजच्या पुस्तकांचा अभ्यास करून सांकेतिक बोलींची माहिती करून घेतली होती. त्यातील ३ चौकट ही वरबोली १ चौकटच्या बोलीवर केली असता नेमका असाच हात भिडूला दाखवते, हे भातखंडेने सगळ्यांना शिकवलं होतं. त्याप्रमाणे त्याने ३ चौकट बोली दिली. आबांकडे इस्पिक-बदाम राजा आणि चौकटची ५ पानं होती. त्यामुळे त्यांनी ३ बिहू बोली दिली आणि ठेका पक्का झाला.

ख्रिस मेनननं चौकट एक्कय़ाची उतारी केली आणि चौकट राजाही वाजवून घेतला. त्यावर भिडूनं एक छोटं बदाम जाळलं. तिसऱ्या दस्ताला ख्रिस इस्पिक दुरी खेळला. इस्पिक एक्का जिंकून बघ्याच्या हातातून आबांनी किलवरचे सहा दस्त भराभर वाजवले. त्यावर आपल्या दक्षिणेच्या हातातून त्यांनी चार इस्पिक, एक बदाम आणि एक चौकट अशी पानं जाळली. त्यांच्या हातात आता इस्पिक-बदाम राजा आणि चौकट गुलाम-९ अशी पानं उरली होती.

ख्रिस मेननला यावर पानं जाळणं थोडं कठीणच जात होतं. चौकट राणी-दश्शी आणि बदाम एक्का ही तीन पानं ठेवणं जरुरी होतं, पण आबांना पानांचा अंदाज सहज येऊ नये म्हणून त्याने तीन इस्पिक आणि एक चौकट याबरोबर बदाम सत्ती आणि गुलाम ही पानं जाळून बदाम छक्की हातात ठेवली.

‘‘आबा, तुम्ही हात धुऊन त्याच्या मागे लागला आहात,’’ असं भातखंडे म्हणाले.

शेवटचं किलवर वाजविण्याआधी आबांनी डावाचा सरासर अंदाज घेतला. ख्रिसकडे ५ चौकटची पानं होती आणि किलवर कटाप. बदाम किंवा इस्पिक या ज्येष्ठ पंथात पाच पानं असती तर अमेरिकेतल्या कर्मकांडाप्रमाणे ख्रिस १ इस्पिक किंवा एक बदाम बोलला असता, त्यामुळे त्या पंथांत ख्रिसकडे ४-४ पानं असावी असा कयास बांधता येत होता. त्यानं तिसऱ्या दस्ताला एक इस्पिक पान खेळलं होतं, तर नंतर ३ जाळली होती, त्याअर्थी आता त्याच्याकडे इस्पिक संपली असावीत हेही स्पष्ट होतं. त्यामुळे आबांनी सातव्या किलवरवर बेधडक इस्पिक राजा जाळला आणि पुढच्या दस्ताला छोटं बदामाचं पान पटावरून खेळून बदाम राजा लावला.

शेवटच्या किलवरवर ख्रिसनं छोटं बदाम जाळलं, पण मग बदाम एक्का जिंकून त्याला चौकट राणी खेळावी लागली आणि शेवटचा दस्त आबांच्या चौकट गुलामाचा होऊन ठेका सुफळ संपूर्ण झाला!

panja@demicoma.com

(आंतरराष्ट्रीय ब्रिज तज्ज्ञ, लेखक, समालोचक, खेळाडू, प्रशिक्षक)