विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असून, त्याचा खेळ पाहून फलंदाजीतील बारकावे शिकायला मिळाले, असा कौतुकाचा वर्षाव न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने विराटवर केला. न्यूझीलंडचा संघ येत्या २२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱया कसोटी मालिकेसाठी भारतात दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या पत्रकार परिषदेत विल्यमसनने विराटच्या खिलाडू वृत्तीचे कौतुक केले. तो म्हणाला की, विराट हा उत्कृष्ट खेळाडू असून, क्रिकेटच्या तिनही प्रकारात प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजविण्याची विराटची गुणवत्ता कौतुकास पात्र आहे. त्याला खेळताना पाहायला मला आवडते. अशा खेळाडूंची फलंदाजी पाहून खूप काही शिकायला मिळते, असेही तो पुढे म्हणाला.

वाचा: ..हे पाच विक्रम भारत-न्यूझीलंड कसोटी मालिकेत मोडीत निघू शकतात

विराटसोबतच ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथ आणि इंग्लंडच्या जो रुटचेही त्याने कौतुक केले. ‘आयसीसी’च्या कसोटी क्रिकेटच्या फलंदाजांच्या क्रमवारीत तिसऱया स्थानी असलेल्या केन विल्यमसनच्या या विनयशील स्वभावाची सोशल मीडियावर नेटिझन्सनीही दखल घेतली. केन विल्यमसन ट्विटरवर ट्रेंडमध्ये आला आहे. स्मिथ आणि रूट यांच्याबद्दल बोलताना विल्यमसन म्हणाला की, स्मिथ आणि रुट हे देखील सर्वोत्तम फलंदाज आहेत. आमच्यातील प्रत्येक फलंदाजाकडे त्याची वेगळी अशी बलस्थानं आहेत. प्रत्येक जण आपल्यातील बलस्थानं ओळखून त्यानुसार आपल्या फलंदाजीला आकार देतो. हीच खरी फलंदाजीची मेख आहे. मला आव्हानं स्विकारायला आवडतात आणि माझ्या हाताशी आता सर्वोत्तम संघ आहे. त्यामुळे ही मालिका माझ्यासाठी अविस्मरणीय ठरेल. एक खेळाडू म्हणून कामगिरीत प्रगती करणे हाच उद्देश मालिकेत राहिल, असेही विल्यमसनने यावेळी सांगितले.

वाचा: विराट कोहली हा मोठा कंजूष व्यक्ती- युवराज सिंग

२६ वर्षीय केन विल्यमसनने न्यूझीलंडकडून खेळताना ५१ पेक्षा अधिक सरासरीने ४३९३ धावा केल्या असून यात १४ दमदार शतकांचा समावेश आहे. ‘आयपीएल’मध्येही केन विल्यमसन खेळला आहे. आयपीएलमध्ये खेळल्याने अनेक अनुभव गाठीशी बांधता आले. आयपीएलसारख्या उत्कंठावर्धक सामन्यांत निर्णय क्षमतेची कसोटी लागते. मी अशा स्पर्धांकडे सकारात्कम पद्धतीनेच पाहतो, पण सध्या कसोटी क्रिकेटकडे लक्ष केंद्रीत केले आहे, असेही विल्यमसन पुढे म्हणाला.