रविवारी झालेल्या आयपीएलच्या लिलावात मुंबईचा अष्टपैलू खेळाडू अभिषेक नायर याला भारतीय खेळाडूंत सर्वात जास्त मागणी होती, अखेर पुणे वॉरियर्स संघाने त्याला ६.७५ लाख डॉलर्स खर्च करून आपल्या संघात घेतला. ६ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या इराणी करंडकावर मी लक्ष केंद्रित केले आहे. त्यानंतर भारतीय ‘अ’ संघातून खेळण्याची मला संधी मिळाली असून या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करून राष्ट्रीय संघात स्थान मिळविण्यासाठी मी प्रयत्नशील असेन. त्यावरच माझे लक्ष असून आयपीएलच्या लिलावामुळे मी हुरळून गेलेलो नाही, असे मुंबईचा अष्टपैलू खेळाडू अभिषेक नायर याने सांगितले.
इराणी करंडकाचा सामना काही दिवसांवर येऊन ठेपला आहे, त्याच्या तयारीमध्ये मी मग्न आहे. या सामन्यामध्ये माझ्याकडून चांगली कामगिरी झाली तर नक्कीच आयपीएलमध्येही चांगली कामगिरी होईल. आयपीएलच्या लिलावात मिळालेल्या पैशांबद्दल विचाराल तर ते माझ्या डोक्यातही नाही. या लिलावातून मिळालेल्या रकमेमुळे मी हुरळून गेलेलो नाही, असे नायर म्हणाला.
चेन्नईमध्ये रविवारी आयपीएलचा लिलाव करण्यात आला, त्या वेळी नायरला पुणे वॉरियर्स संघाने ६.७५ लाख डॉलर्स खर्च करून संघात घेतले. नायर सुरुवातीला मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत होता. त्यानंतर त्याला किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने घेतले होते. नायरने यंदाच्या रणजी मोसमात ९५० पेक्षा अधिक धावा केल्या असून १९ बळीही घेतले आहेत.
पुणे वॉरियर्स संघाने माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे तो सार्थ ठरवण्याचा मी प्रयत्न करेन. माझ्या लौकिकाला साजेसा खेळ करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो, पण माझ्यासाठी सध्याच्या घडीला इराणी करंडक आणि भारतीय ‘अ’ संघाचा सामना महत्त्वाचा आहे, कारण या सामन्यात चांगली कामगिरी करून मी निवड समिती सदस्यांचे लक्ष वेधून घेऊ शकतो, असे नायर म्हणाला.