भारताचा 2007-08 सालचा ऑस्ट्रेलिया दौरा हा सिडनी कसोटीतील नाट्यामुळे चांगलाच रंगला होता. हरभजन सिंह – अँड्रू सायमंड्स यांच्यातला मंकीगेटचा वाद, पंचांचे वादग्रस्त निर्णय आणि भारताचा पराभव यामुळे दोन क्रिकेट बोर्डांमधले संबंध चांगलेच ताणले गेले होते. सिडनी कसोटीनंतर भारताच्या मधल्या फळीतला फलंदाज व्ही.व्ही.एस लक्ष्मण हा प्रचंड निराश झाला होता आणि त्याने आपल्या सहकाऱ्यांना बॅगा भरुन ऑस्ट्रेलिया सोडण्याचा सल्ला दिला होता. आपल्या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात लक्ष्मणने हा गौप्यस्फोट केला आहे.

“सिडनी कसोटीत घडलेल्या घटनांनंतर मी माझ्या सहकाऱ्यांना बॅग भरुन ऑस्ट्रेलिया सोडून जाऊया असं विचारलं होतं. पंचांचे वादग्रस्त निर्णय, हरभजन-सायमंड्स वाद यामुळे वातावरण दुषित झालं होतं. मात्र आमच्या संघाचा तत्कालीन कर्णधार अनिल कुंबळेने ज्या पद्धतीने ते प्रकरण हाताळलं त्याचं खरंच कौतुक करावं तितकं कमी आहे. चर्चा करुन आमची योग्य बाजू मांडण्याचं काम अनिल कुंबळेने केलं. यानंतर पर्थ कसोटीत आम्ही मिळवलेला विजय हा खऱ्या अर्थाने आनंद देणारा होता. सिडनी कसोटीत आमच्या संघाला ज्या पद्धतीने पराभव स्विकारावा लागला होता, त्यानंतर आम्ही सामना जिंकणं गरजेचं होतं.” लक्ष्मण पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होता.

लक्ष्मणच्या आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्याला त्याच्या जुन्या साथीदारांनी हजेरी लावली होती. विरेंद्र सेहवाग, आशिष नेहरा, इरफान पठाण, मुरली कार्तिक, गौतम गंभीर हे खेळाडू सोहळ्याला हजर होते. यावेळी बोलत असताना प्रत्येक खेळाडूने आपल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील आठवणींना उजाळा दिला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ गुरुवारपासून अॅडलेडच्या मैदानावर पहिला कसोटी सामना खेळणार आहे.