१५ ऑगस्टच्या संध्याकाळी भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. धोनीपाठोपाठ त्याचा सहकारी सुरेश रैनानेही आपलं निवृत्ती जाहीर केली. धोनी, रैना आपल्या इतर सहकाऱ्यांसह सध्या चेन्नईत आयपीएलच्या तेराव्या हंगामाची तयारी करत आहेत. चेन्नई सुपरकिंग्जचे मालक आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष एन.श्रीनीवासन यांनी धोनीच्या निवृत्तीविषयी बोलत असताना इंडियन एक्स्प्रेससोबत एक खास आठवण शेअर केली. २०११ विश्वचषक विजयानंतरही निवड समितीला धोनीला कर्णधारपदावरुन हटवायचं होतं. पण श्रीनीवासन यांनी आपल्या अध्यक्षपदाचे विशेष अधिकार वापरत धोनीच भारतीय संघाचा कर्णधार राहिल हे सांगितलं.
अवश्य वाचा – धोनीची निवृत्ती : चेन्नई सुपरकिंग्जच्या CEO नी उलगडलं सात वाजून २९ मिनीटांचं गणित
२०११-१२ रोजी भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात धोनीच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी अतिशय खराब झाली. कसोटी मालिकेत भारताला ०-४ असा मानहानीकारक पराभव स्विकारावा लागला होता. त्यावेळी निवड समितीने धोनीला कर्णधारपदावरुन हटवण्याचा निर्णय घेतला होता, हा निर्णय घेताना धोनीचा पुढचा वारसदार कोण असेल हे देखील त्यांनी ठरवलं होतं. मला हे समजलं तेव्हा आश्चर्यचं वाटलं. काही महिन्यांपूर्वी जो कर्णधार तुम्हाला विश्वचषक जिंकवून देतो त्याला तुम्ही कर्णधारपदावरुन कसं काढू शकता?? त्यावेळी निवड समिती धोनीला खेळाडू म्हणून संघात सहभागी करणार होती, श्रीनीवासन इंडियन एक्स्प्रेसशी बोलत होते.
“तो दिवस मला आजही आठवतोय. सुट्टी होती मी गोल्फ खेळून परत येत होतो. संजय जगदाळे त्यावेळी बीसीसीआयचे सचिव होते. ते माझ्याकडे आले आणि म्हणाले, सर निवड समिती धोनीला कर्णधारपदी ठेवण्यास तयार नाहीये. ते धोनीला खेळाडू म्हणून संघात स्थान द्यायला तयार आहेत. मी थेट निवड समितीच्या मिटींगमध्ये गेलो आणि म्हणालो धोनीच भारतीय संघाचा कर्णधार राहिल. तो फक्त खेळाडू म्हणून खेळणार नाही. बीसीसीआय अध्यक्ष या नात्याने धोनीच कर्णधार राहिल याची मी काळजी घेतली.” श्रीनीवास यांनी आठवण सांगितलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धोनीने निवृत्ती घेतली असली तरीही पुढील काही हंगाम तो आयपीएलमध्ये खेळत राहणार आहे.