वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्यासाठी नुकतीच संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. दोन कसोटी सामन्यांसाठी विराट कोहलीकडे पुन्हा एकदा भारतीय संघाचं नेतृत्व देण्यात आलं आहे. या संघात पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर या नवोदीत खेळाडूंनी जागा मिळवली आहे. मात्र भारताचा कसोटी क्रिकेटमधला त्रिशतकवीर करुण नायर पुन्हा एकदा संघात जागा मिळवण्यात अपयशी ठरला आहे. करुणला संघातून वगळण्याच्या निवड समितीच्या निर्णयाबद्दल सोशल मीडियावर क्रीडा प्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांनी संघ निवडीबद्दल आपण करुण नायरशी सविस्तर बोललो असून त्याची संघात निवड का करण्यात आली नाही याची कारणं त्याला सांगितलेलं आहे.

“वेस्ट इंडिज दौऱ्याची संघ निवड झाल्यानंतर मी स्वतः करुण नायरशी बोललो होतो. यावेळी संघात पुनरागमनाबद्दल असणाऱ्या शक्यताही मी त्याला सांगितल्या आहेत. त्यामुळे एखाद्या खेळाडूला कोणत्या कारणासाठी संघातून वगळण्यात येतंय याबद्दल निवड समितीने आपली बाजू नेहमी सुस्पष्ट ठेवली आहे.” प्रसाद यांनी पीटीआयशी बोलताना माहिती दिली आहे.

भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी करुण नायरची संघात निवड करण्यात आली होती. मात्र ५ पैकी एकाही कसोटी सामन्यात करुण नायरला अंतिम संघात स्थान मिळू शकलं नाही. अखेरच्या कसोटीत भारतीय संघ व्यवस्थापनाने संघात बदल केले, त्यावेळेलाही नवोदीत हनुमा विहारीला जागा देण्यात आली. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संघ व्यवस्थापन करुण नायरच्या कसोटी संघातील समावेशाबद्दल खूश नव्हतं. काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत करुण नायरने आपल्याला निवड समितीपैकी कोणीही संपर्क साधला नसल्याचं म्हटलं होतं. करुणने स्थानिक क्रिकेट आणि भारत अ संघाकडून खेळत असताना चांगल्या धावा काढत राहिल्यास त्यालाही संघात जागा मिळू शकते असं एम. एस. के. प्रसाद म्हणाले.