आपल्या कारकिर्दीत वादग्रस्त निर्णय देण्यासाठी प्रसिद्ध असलेले पंच स्टिव्ह बकनर यांनी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २००८ साली सिडनी कसोटीदरम्यान आपल्या हातून झालेल्या चुकांची कबुली दिली आहे. २००८ साली भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातला सिडनी कसोटी सामना हा पंच स्टिव्ह बकनर आणि मार्क बेन्सन यांचे चुकीचे निर्णय…आणि ‘मंकीगेट’ प्रकरणामुळे चांगलाच गाजला होता. मिड-डे वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बकनर यांनी आपल्या दोन चुकांमुळे भारताला कसोटी सामना गमवावा लागला हे मान्य केलं आहे.

“२००८ साली सिडनी कसोटी सामन्यात माझ्याकडून दोन चुका झाल्या. पहिली चूक म्हणजे भारतीय संघ ज्यावेळी चांगली कामगिरी करत होता त्यावेळी माझ्यामुळे ऑस्ट्रेलियन फलंदाज शतक पूर्ण करु शकला. दुसरी चूक ही पाचव्या दिवशी घडली…ज्यामुळे भारताला सामना गमवावा लागला. पण अशा चुका करणारा मी पहिलाच अंपायर नव्हतो. पण तरीही या दोन चुका मला आयुष्यभर सतावत राहणार आहेत.” बकनर यांनी स्पष्टीकरण दिलं. पण या चुका पंचांकडून का होतात हे देखील जाणून घेतलं पाहिजे. मला कोणतीही सबब द्यायची नाही. पण कधीतरी मैदानात हवा इतकी असते की काही गोष्टी ऐकायला येत नाहीत, बकनर यांनी आपली बाजू मांडली.

कॉमेंट्री करणाऱ्या लोकांना स्टम्प माईकमुळे चेंडू बॅटला लागला हे कळतं…पण मैदानातला प्रेक्षकांचा आवाज आणि हवा या गोष्टींमुळे कधीकधी पंचांना हा आवाज ऐकायला येत नाही. या गोष्टी प्रेक्षकांना कळत नाहीत आणि नंतर पंचांवर टीका होते, असं बकनर म्हणाले. २००८ सिडनी कसोटी सामन्यात भारताकडून सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांना बकनर यांच्या चुकीच्या निर्णयाचं बळी ठरावं लागलं होतं. तर अँड्रू सायमंड्स आणि रिकी पाँटींग हे स्पष्ट बाद असतानाही त्यांना नाबाद ठरवण्यात आलं. सामन्यावर चांगली पकड घेतलेली असतानाही भारताला हा सामना गमवावा लागला होता.